Wednesday, August 6, 2014

शेती देशोदेशीची- 2 - आॅस्ट्रिया, नेदरलॅन्ड

"ऑस्ट्रिया'तील शेतकऱ्यांचे
एकात्मिक शेतीला प्राधान्य
-------------
काशिनाथ श्रीपत डुकरे
-------------
ऑस्ट्रियामधील शेतकरी एखाद्या परिपूर्ण उद्योगासारखी एकात्मिक शेती करतात. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्धव्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन, शेतमाल प्रक्रीया व उत्पादनांच्या विक्रीबरोबरच घराच्या छपरावर सौर उर्जा निर्मितीचा पुरक व्यवसाय करण्याची आधुनिकता व व्यवहारीपणा यांचा सुरेख मेळ येथिल प्रगतशिल शेतकऱ्यांनी साधला आहे. यामुळे त्यांचा शेती व्यवसाय कमी धोक्‍यांचा, जादा नफ्याचा व अधिक शाश्‍वत झाला आहे.
--------------
स्वित्झरलॅन्ड, इटली, जर्मनी, हंगेरी आदी सात देशांच्या नजिकतेमुळे शेती उत्पादन व बाजारपेठेच्या दृष्टीनेही ऑस्टीयाचे युरोपमधील स्थान महत्वपुर्ण आहे. सुमारे 84 हजार चौरस किलोमिटरच्या या देशात 30 ते 35 हजार चौरस किलोमिटर क्षेत्र शेतीखाली असून लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के लोक हा व्यवसाय करतात. त्यातही निम्मे शेतकरी 10 हेक्‍टरपेक्षा कमी जमीनधारणा असलेले तर 40 टक्के शेतकरी पाच हेक्‍टरहून कमी जमीनधारणा असलेले आहेत. कॉर्पोरेट फार्मिंगचे प्रमाणही येथे जास्त आहे. अन्नधान्य, दुध, पशुपालन व मांस उत्पादन या चार बाबींवर त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

फ्लॉरेसबर्ग जवळच्या एका गावातील शेती आम्ही पाहिली. या शेतकऱ्यांकडे गहू, बार्ली, ओट, बटाटा अशी पिके होती. पिकाची पेरणी, तणनाशकांची फवारणी व पिकाची काढणी या तिनच गोष्टी त्याच्यासाठी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. खात्रीशीर हवामान व रोगराईचे प्रमाण कमी असल्याने उत्पन्नही खात्रीशीर आहे. चार देशांच्या 10 दिवसांच्या प्रवासात कुठे एखादा किडा किंवा चिलटे दिसली नाहीत. वातावरण एवढे स्वच्छ व निर्मळ आहे की पिकांवर फार काही प्रकारची रोगराई नाही. बटाट्याचे पिक फुलांवर आले होते पण एक पानही किडीने चाटलेले, खाल्लेले नव्हते. किटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर त्यांच्याकडे नगण्य आहे. तणनाशकांचा वापर मात्र जास्त आहे. आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याचे दोन गोठे होते. गोठ्यांबरोबरच मुक्त पद्धतीचाही अवलंब केलेला होता. त्यासाठी शेतीच्या काही भागात गोठ्याजवळच कुरण राखून ठेवलेले होते. शेतकऱ्यांच्या आहारात गहू, बार्ली पासून बनविलेले रेडी टू ईट प्रकारचे ब्रेडसारखे खाद्यपदार्थ जास्त असतात.

- गाईंच्या नैसर्गिक गर्भधारणेवर भर
येथिल बहुतेक शेतकर्यांकडे तांबड्या-पांढर्या रंगाच्या होस्टेन फ्रिजियन जातीच्या गाई आहेत. आपल्यासारख्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या गाई त्यांच्याकडे दिसल्या नाहीत. त्याचे दुग्धउत्पादनासाठीच्या पशुपालनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाईंची गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने घडून आणतात. यासाठी गाईंच्या कळपात जातीवंत वळू आवर्जून ठेवले जातात. त्यापासून तयार झालेल्या कालवडी वाढवून अधिक दुध उत्पादन देणाऱ्या गाई घरच्या घरी तयार करण्याकडेही त्यांचा कटाक्ष असतो. दररोज 35 ते 40 लिटर दुध देणाऱ्या गाई त्यांच्याकडे आहेत. आपल्यासारखी तीन वेळा दुध काढण्याची पद्धत त्यांच्याकडे नाही. ते गाईंचे दुध सकाळ-संध्याकाळ याप्रमाणे दोन वेळा आढतात. त्यांच्याकडे म्हशी नाहीत. यामुळे दुध उत्पादन म्हणजे गाईचेच दुध असे त्यांचे सर्वसाधारण समिकरण आहे.

- करार शेती, पुरक व्यवसाय
आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्यांची स्वतःची 10 हेक्‍टर शेती होती. याशिवाय त्याने आणखी 30 हेक्‍टर शेती करार पद्धतीने कसायला घेतली होती. इथले शेतकरी पिक उत्पादनाबरोबरच विविध प्रकारचे पुरक व्यवसायही कौशल्याने करतात. या शेतकऱ्यांचा मांसासाठीचा वराहपालन प्रकल्प होता. एका जोडीपासून 30 वराह तयार झाले होते. त्यांचे मांसही हा शेतकरी स्वतःच ड्रेसिंग करुन ग्राहकांना थेट विकत होता. त्यासाठी त्याने त्याचे स्वतःचे छोटे दुकानही तयार केले होते. त्याच्याकडे तयार केले जाणारे पदार्थ, धान्य, भाजीपालाही याच ठिकाणी विक्रीला ठेवत होता. सर्व उत्पादने पॅकिंगमध्ये व प्रत्येकावर किमतीचे लेबल लेबल होते.

- फिरते कुक्कुटपालन
फ्रान्समधील एका विशिष्ट जातीच्या कोंबड्या ऑस्ट्रियामध्ये अधिक प्रमाणात पाळण्यात येत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याकडेही याच प्रकारच्या 500 कोंबड्या होत्या. त्यासाठी त्याने आपल्या कंटेनरएवढी ट्रॅक्‍टरला ट्रॉलीसारखी जोडता येईल, कोठेही नेता येईल अशी फिरती पोल्ट्री तयार केलेली आहे. अंडी व मांस दोन्हींचे उत्पादन तो घेत होता. ग्राहकाच्या मागणीनुसार कोंबडी कापून, मांस ड्रेसिंग करुन स्वतःच्या शेतावरील दुकानात पॅकिंगमध्ये विकण्याचे कामही तो स्वतःच करत होता.

- सौर उर्जानिर्मितीचा पुरक व्यवसाय
ऑस्ट्रियातील विशेषतः फ्लॉरेसबर्ग परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या तिव्र उताराच्या दुपाखी घराच्या संपूर्ण छपरावर सौर उर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरु केले आहेत. यासाठी तेथिल शासनामार्फत त्यांना विविध प्रकारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौर प्रकल्पासाठी शेतकर्यांना कर्जही उपलब्ध करण्यात येत आहे. प्रकल्प उभारणी, व्यवस्थापन आदी बाबत शेतकर्यांना मार्गदर्शनही सहज उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडील अतिरिक्त विज विकत घेण्याची यंत्रणा येथिल शासनाने चांगली राबवली आहे. शेतकरी स्वतःची गरज भागवून उरलेली विज आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा शासनाला विकतात.


No comments:

Post a Comment