Wednesday, August 27, 2014

जावे पुस्तकांच्या गावा - दुसरी हरितक्रांती, शरद पवार

जावे पुस्तकांच्या गावा - संतोष डुकरे
---------------
पुस्तकाचे नाव - दुसरी हरितक्रांती
लेखक - शरद पवार
प्रकाशक - अमेय प्रकाशन, 1890, नातूबाग, पुणे 30. संपर्क ः 020 25677571
किंमत - 255 रुपये
पृष्ठे - 288
-----------------
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीए सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये सलग 10 वर्षे देशाच्या कृषीमंत्री पदाची धुरा सांभाळली. देशाच्या शेतीचा चेहरामोहरा या काळात पूर्णतः बदलला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कालखंडात देशातील शेती व्यवसायाला दुष्काळ, महापूर, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. त्यात शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र अशा परिस्थितीतूनही समर्थपणे मार्ग काढत शेतीसाठीच्या पतपुरवठ्यापासून ते निर्यातीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात उच्चांकी कामगिरी झाली. यात श्री. पवार यांची भुमिका आणि त्यांनी आखलेली धोरणे महत्वाची ठरली. शेतीमधील जुन्या प्रस्थापित वाटा समृद्ध करण्याचे आणि नव्या वाटा शोधून प्रस्थापित करण्यावर त्यांनी भर दिला. फलोत्पादन, अन्न सुरक्षा, यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन, कृषी शिक्षण, शाश्‍वत शेती, पिक उत्पादकतावाढ आदी अभियाने यशस्वी केली.

देशाची पहिली हरितक्रांती ही काही ठराविक राज्यांपुरती व पिकांपुरती मर्यादीत होती. मात्र पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली दशकभर झालेल्या कामाने कृषी क्षेत्रातील क्रांतीचा दुसरा टप्पा यशस्वीपणे गाठला गेला. कृषी क्षेत्राची पुढील वाटचाल आणि दिशा यांचे बिजारोपनही याच दशकात झाले. शरद पवार यांनी देशाला अवमानकारक स्थितीतून बाहेर काढून कृषीव्यवस्थेचा पाया यांनी खंबिर केला, या शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. श्री. पवार यांनी घातलेल्या कृषी व्यवस्थेच्या खंबिर पायाचे विविध आयाम त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहेत. कृषी क्षेत्राची भावी वाटचाल आणि संधींची चाहूल घेण्यासाठी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली घडलेली हरितक्रांती आणि तिचे विविध आयाम समजून घेणे महत्वाचे ठरेल. यासाठी श्री. पवार यांनी भाषणांतून उलगडलेला हरितक्रांतीचा प्रवास सुत्रबद्धपणे मांडणारे हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरु शकते.
----------------- 

No comments:

Post a Comment