Friday, August 1, 2014

ऑगस्टचा पहिला आठवडा कमी पावसाचा ?

कोकणात पावसाचा अंदाज कायम

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्टचा पहिला आठवडा कमी पावसाचा जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या आठ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प (सबड्युड) राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या कमी कालावधीच्या अंदाजानुसार येत्या रविवारपर्यंत (ता.3) कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. याच वेळी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाठोपाठ मध्यम कालावधीच्या अंदाजात चार ते आठ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान अंदाजाच्या उपविभागांमध्ये महाराष्ट्राचा समावेश पेनान्सुलार इंडिया या क्षेत्रात केला जातो. नेमक्‍या याच भागात सर्वत्र आठ ऑगस्टपर्यंत पाऊस अत्यल्प (सबड्युड) राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त पश्‍चिम किनारपट्टीवर बहुतेक ठिकाणी तर हिमालयाच्या पायथ्याकडील भाग, उत्तर प्रदेश, पुर्व व लगतच्या मध्य भारतातील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात ओडिशा व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेले. याच वेळी समुद्रसपाटीच्या पातळीवर दक्षिण गुजरात, कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत सक्रीय असलेल्या किनारी कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार केरळच्या किनाऱ्यापर्यंत वाढला. सौराष्ट्र व कच्छच्या भागावर समुद्रसपाटीच्या पातळीहून सुमारे 900 मिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. याच वेळी उपसागराच्या उत्तर भागातही समुद्रसपाटीच्या पातळीहून 5.8 ते 9.5 किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय झाले आहेत.
----------(समाप्त)----------- 

No comments:

Post a Comment