Thursday, August 28, 2014

जलदिंडीच्या प्रारंभासाठी अष्टविनायक देवस्थाने सज्ज

विविध उपक्रमांचे आयोजन; तनिष्का करणार जलजागृती

पुणे (प्रतिनिधी) ः हरितालिकेपासून (ता.28) अष्टविनायकांपासून सुरु होणाऱ्या जलदिंडीसाठी सर्व अष्टविनायक देवस्थाने सज्ज झाली आहेत. स्थानिक ग्रामस्थ, महिला, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व तनिष्का भगिनींमार्फत यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतीक व प्रबोधनपर कार्यक्रमांबरोबरच घरा घरांवर गुढ्या उभारण्यात येणार आहेत. काही गावांमध्ये नदीतून पवित्र तिर्थाची कलशयात्राही काढण्यात येणार आहेत.

जलदिंडीचे स्वागत आणि पुजन पारंपरिक पद्धतीने केल्यानंतर सर्व अष्टविनायकांच्या ठिकाणी अथर्वशिर्ष, पर्जन्यसुक्‍ताने कार्यक्रमाला सुरवात होईल. पाण्याविषयीचा जागर करणारे सांस्कृतीक कार्यक्रम तनिष्का सदस्या आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सादर करणार आहेत. गेली तीन आठवडे त्याची तयारी सुरु आहे. या सांस्कृतीक कार्यक्रमांबरोबरच पाणीविषयक 32 उपक्रमांतील पर्जन्यजलसंवर्धन, सार्वजनिक नळांना तोट्या बसवणे, शुद्ध पाण्याचा आग्रह धरणे, जुन्या विहीरी व ओढ्यांतील गाळ काढणे, मिटर पद्धतीचा आग्रह, ठिबक सिंचनाचा अवलंब अशा एखाद्या उपक्रमाची जबाबदारी तनिष्का सदस्य व नागरिक घेणार आहेत.

रांजणगावमध्ये ग्रामस्थ घरावर गुढया उभारणार आहेत. सनई चौघड्याच्या निनादात पंचकलशाची पुजा होणार असून यावेळी तनिष्काच्या 300 हून अधिक सदस्या पर्जन्यसुक्त म्हणणार आहे. या जलदिंडीच्या मिरवणूकीची सजवलेल्या बैलगाड्या, तनिष्कांची दुचाकी रॅली, विद्यार्थ्यांची मानवी साखळी, मुख्याध्यापकांनी रचलेली पावसाची गाणी व तनिष्कांमार्फत पाण्याविषयक घोषणा ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

- नदीपात्रात होडीतून कलशयात्रा
सिद्धटेकमध्ये तहसिलदार टॅंकरला हिरवा झेंडा दाखवणार असून विद्यार्थीनींचे लेझिम पथक, विद्यार्थ्यांचा जलसंकल्प व पाच गावात नदीपात्रातून होड्यांमधून काढण्यात येणारी कलशयात्रा ही वैशिष्ट्ये आहे. थेऊरमध्ये ढोल लेझिम, बॅंड पथक, विद्यार्थ्यांनी केलेली घोषवाक्‍ये यांनी जलदिंडीची रंगत वाढणार आहे. मोरगावमध्ये स्काऊड गाईडचे विद्यार्थी जलदिंडीला सलामी देणार आहेत. विद्यार्थ्यांमार्फत जलगिते व पथनाट्येही सादर करण्यात येणार आहेत. ओझरमध्येही विद्यार्थी पाणी वाचवा, बचतीवर नाटक सादर होणार आहे. आळेफाटा व बेल्हा येथे पांडवकालिन बारव स्वच्छ करण्यात येणार आहे. लेण्याद्री येथेही ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
------------- 

No comments:

Post a Comment