Wednesday, August 20, 2014

एमपीकेव्हीचा २३ शासकीय महाविद्यालयांचा मास्टर प्लॅन

पुणे (प्रतिनिधी) ः प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी व संलग्न महाविद्यालय सुरु करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी 23 नवीन कृषी व संलग्न महाविद्यालये सुरु करण्याचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केला आहे. यापैकी सात महाविद्यालयांना विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने मान्यता दिली असून त्यांचे प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविण्यात आले आहेत. उर्वरीत महाविद्यालयांचे प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येणार आहेत.

पुण्यात पाच, राहुरीत चार, धुळ्यात तीन, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक व जळगावात प्रत्येकी दोन तर सांगलीत एक महाविद्यालय प्रस्तावित आहे. यापैकी सात महाविद्यालयांचे प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या बैठकीत संमत होऊन राज्य शासनाच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे सादर करण्यात आले आहेत. उर्वरीत महाविद्यालयांचे प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव सुनिल वानखेडे यांनी दिली.

राहुरीमध्ये प्रस्तावित असलेल्या महाविद्यालयांसाठी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील सुमारे 100 हेक्‍टर जमीन तर पुण्यातील महाविद्यालयांसाठी पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. जळगावमध्ये कृषी महाविद्यालयासाठी आवश्‍यक 40 हेक्‍टरपैकी 13.01 हेक्‍टर जमीन जळगावच्या बिजगुणन केंद्राकडून तर उर्वरीत जमीन स्थानिक पातळीवर जवळच्या भागात उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा आहे. सांगलीत कृषी महाविद्यालयासाठी डिग्रज तालुका बीज गुणन केंद्राची 11.91 हेक्‍टर व कुपवाडच्या शासकीय रोपवाटीकेची 25.56 हेक्‍टर जमीन उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. इतर ठिकाणी शासनाकडून जमीन उपलब्ध होण्याची विद्यापीठाची अपेक्षा आहे

सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत 49 कायमस्वरुपी विना अनुदानित महाविद्यालये कार्यरत आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यात 11, पुणे जिल्ह्यात 8, नाशिमध्ये 9, साताऱ्यात 6, सांगलीत 3, सोलापूरात 4, जळगावमध्ये 3, कोल्हापूरात 3 तर धुळे व नंदुरबारमध्ये प्रत्येकी एक महाविद्यालय सुरु आहे.

- जिल्हानिहाय प्रस्तावित महाविद्यालये
पुणे --- पशुसंवर्धन, कृषी पशु संवर्धन, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन
धुळे --- वनिकी, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान
कोल्हापूर --- मत्स्य व्यवसाय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन
नगर (राहुरी) --- काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी
नाशिक --- कृषी, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान
सातारा (कराड) --- अन्न तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान,
सोलापूर --- कृषी, उद्यानविद्या
जळगाव --- कृषी, उद्यानविद्या
सांगली --- उद्यानविद्या
--------------
- कार्यकारी परिषदेची संमती, कृषी परिषदेकडे प्रस्तावित
प्रस्तावित महाविद्यालय --- आवश्‍यक जमीन (हेक्‍टर) --- प्रस्तावित पदे --- एकूण खर्च (कोटी रुपये)
कृषी, राहुरी --- 40 --- 60 --- 52.76
कृषी जैवतंत्रज्ञान, राहुरी --- 20 --- 84 --- 54.69
अन्न तंत्रज्ञान, राहुरी --- 20 --- 54 --- 48.71
कृषी व्यवसाय व्यवस्थापन, पुणे --- 20 --- 88 --- 58.49
कृषी, सांगली --- 40 --- 101 --- 61.61
कृषी, सोलापूर --- 40 --- 101 --- 42.70
कृषी, जळगाव --- 40 --- 101 --- 61.61
------------- 

No comments:

Post a Comment