Thursday, August 28, 2014

अमाप उत्साहात जलदिंडीला प्रारंभ

अष्टविनायकांहून 9 दिंडी मार्गस्थ; दुष्काळमुक्तीचा निर्धार होतोय पक्का

सकाळ वृत्तसेवा
पुणे ः अष्टविनायकांच्या पवित्र स्थानांपासून पर्जन्यधारांच्या साक्षीने निघालेल्या जलदिंड्या जलस्वयंपूर्णतेचा संदेश देत आज महाराष्ट्रभर मार्गस्थ झाल्या. पर्जन्यसुक्त, अर्थर्वशीर्ष, मंत्रोच्चारात गणरायाला अभिषेक व कलशपूजनाने गुरुवारी (ता.28) सकाळी डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशन व सकाळ माध्यम समुहाच्या सर्व जल अभियानाला प्रारंभ झाला. तनिष्का भगिनी विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच समाजातील विविध स्तरातील नागरिकांच्या प्रचंड उत्साहात भजने, लेझिम, ढोल ताशांचा गजर व शाहिरी जल्लोशाने जलदिंडी सोहळ्यात आगळीच रंगत भरली. जलदिंडी मार्गावरील गावागावात महिलांनी टॅंकरवर पुष्पवृष्टी करत दिंडीला शुभेच्छा दिल्या.

जलदिंडीबद्दल गेल्या आठ दिवसांपासून असलेली उत्सूकता गुरुवारी सकाळी टिपेला पोचली. अष्टविनायक परिसरातील गावांमधून अष्टविनायकांच्या ठिकाणी दिंडीत सहभागी होण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उसळला. दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांनी दुष्काळमुक्तीचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थी, महिला, पुरुषांनी या उपक्रमात योगदानाची शपथ घेतली. अनेक संस्थांनी पाणी बचत, वापर व जलसंवर्धन विषयक उपक्रम राबविण्याचे निश्‍चित केले. या सर्वच उपक्रमांमध्ये तनिष्का भगिनींचा यात मोठा सहभाग होता. फिनोलेक्‍स पाईप्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर नेटाफिम इरिगेशन हे सहप्रायोजक आहेत.

रांजणगाव येथिल महागणपतीचे आशिर्वाद घेवून दोन जलदिंड्या विदर्भाकडे मार्गस्थ झाल्या. थेऊर येथे पावसाच्या सरी अंगावर झेलत शेकडो विद्यार्थ्यानी घोषणा देत जलदिंडीची रंगत वाढवली. कलशाचे मंत्रोच्चारात चिंतामणी मंदीरापासून दिंडीचे नांदेडच्या दिशेने प्रस्थान झाले. सिद्धटेकला विद्यार्थीनींचे लेझिम पथक व आसमंत दणाणून सोडणारा ढोलांचा नाद या वातावरणात सिद्धिविनायकाला जलाभिषेक करुन पवित्र तिर्थ टॅंकरमध्ये मिसळण्यात आले. कोकणातील दिंड्यांची सुरवात महडचा वरदविनायक व पालीच्या बल्लाळेश्‍वराचे आशिर्वाद घेवून झाली. या दोन्ही ठिकांनी विद्यार्थ्यांसह तनिष्का भगिनी व नागरिकांचा मोठा सहभाग होता.

ओझरमध्ये पारंपरिक वेशात विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले. विघ्नहर्त्याचे आशिर्वाद घेवून हलगी पथकाच्या गजरात दिंडीची ओझर गावातून मिरवणूक काढण्यात आली. मोरगावला पर्जन्यसुक्त व अथर्वशिर्षाचा मंत्रोच्चाराने वातावरण भारुन गेले. मयुरेश्‍वर मंदिरापासून जलदिंडींला पुष्पवृष्टीत प्रारंभ झाला. लेण्याद्री येथून गिरिजात्मजास महाअभिषेक घालून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. बाल वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात आणि शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमाच्या तालावर दिंडीची मिरवणूक काढली. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे लेण्याद्रीहून आलेल्या जलदिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, आमदार गिरिष बापट, पोलिस आयुक्त सतिश माथूर, सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, स्ट्रॅटेजिक कॉन्सिलचे प्रमुख बॉबी निंबाळकर, संपादक मल्हार अरणकल्ले, निवासी संपादक नंदकुमार सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. मल्हार अरणकल्ले यांनी यावेळी उपस्थितांना पाणी बचतीची शपथ दिली.

महाराष्ट्राचा पाणी प्रश्‍न येत्या पाच वर्षात पूर्णतः सोडविण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन आणि सकाळ माध्यम समुहामार्फत युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वॉटर लॅबमधून 32 उपाययोजना निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवून दुष्काळमुक्तीच्या कार्यातील जनसहभाग वाढवून लोकचळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्व जल अभियानाअंतर्गत जलदिंडी आयोजन करण्यात आले आहे.
-----------(समाप्त)------------ 

No comments:

Post a Comment