Wednesday, August 27, 2014

पालघर जिल्ह्यासाठी कृषीची ४१ पदे मंजूर

पुणे (प्रतिनिधी) ः ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन तयार करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. कृषी विभागाच्या 2009 च्या सुधारीत आकृतीबंधानुसार अधिक्षक कार्यालयासाठी 37 तर कृषी विकास अधिकारी कार्यालयासाठी चार अशा एकूण 41 पदांची भरती करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन एक ऑगस्ट 2014 पासून पालघर, वसई, डहाणु, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा व विक्रमगड या तालुक्‍यांचा समावेश करुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. त्याचे मुख्यालय पालघर येथे ठेवण्यात आले आहे. यातील तालुका स्तरावर कार्यरत असलेला कृषी विभाग व पंचायत समित्यांचा अधिकारी व कर्मचारी वर्ग पुर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. मात्र जिल्हास्तरीय कार्यालये नवीन स्थापन करण्यात येणार असल्याने या ठिकाणी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय आकृतीबंधानुसार आवश्‍यक असलेली पदे नव्याने भरण्यात येणार आहेत.

कृषी विकास अधिकारी कार्यालयासाठी एक कृषी विकास अधिकारी, एक मोहीम अधिकारी व दोन जिल्हा कृषी अधिकारी अशी चार पदे मंजूर झाली आहेत. नव्या रचनेमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे शिपाई, पहारेकरी, नाईक, सफाईगार इ. वेगवेगळे संवर्ग न ठेवता चतुर्थश्रेणी कर्मचारी असा एकच संवर्ग चतुर्थश्रेणी कर्मचारी असे पद राहणार आहे. या सर्वांच्या कामाचे स्वरुप व जबाबदारी विविध प्रकारच्या (मल्टिटास्क्रींग) स्वरुपाच्या राहणार आहेत. या पदांची कामे बाह्यस्त्रोतांद्वारे करुन घेताना निकष ठरवून कामे द्यावीत, असेही शासनामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी मंजूर पदे व संख्या ः जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी 1, कृषी उपसंचालक 1, ब वर्ग अधिकारी 4, ब वर्ग कनिष्ट अधिकारी 2, सहाय्यक प्रशासन अधिकारी 1, लेखा अधिकारी 1, कृषी सहायक 2, अनुरेखक 2, आरेखक 1, अधिक्षक 2, वरिष्ठ लिपीक 5, लिपिक टंकलेखक 3, लघुलेखक 1, लघुटंकलेखक 2, वाहनचालक 2, चतुर्थश्रेणी कर्मचारी 7
--------------- 

No comments:

Post a Comment