Sunday, August 24, 2014

धो धो पाऊस, विजांचे तांडव

श्रावणात बरसताहेत मघा !!!

पुणे (प्रतिनिधी) ः श्रावणाचा पाऊस म्हटले की डोळ्यासमोर येते रिमझिम रिमझिम बरसात. हलक्‍या श्रावणसरी. रानात चरणाऱ्या म्हशीची पाठ ओली आणि पोट कोरडे ठेवणारा आल्हाददायक झिम्माड पाऊस... असे त्यांचे वर्षानुवर्षाचे स्वरुप. यंदा मात्र वर्षानुवर्षाची ही ओळख पुसून मघा लागल्यानंतर श्रावण अधिक आक्रमक झाला आहे. अतिवृष्टीची सिमा गाठून धो धो कोसळणारा, विजा कोसळून जिवित आणि वित्त हानी करणारा हाच का तो श्रावण असा प्रश्‍न प्रश्‍न पडावा इतपत त्यात धडधडीत बदल दिसून येत आहे.

यंदा एक तर श्रावण कोरडा आणि पाऊस पडला तर वादळी स्वरुपाचा धो धो असे त्याचे स्वरुप आहे. नेहमीचा रिमझिम श्रावण यंदा फारसा पडलाच नसल्याने राज्यभर हवामान अभ्यासक आणि शेतकयांकडूनही अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी श्रावण शुक्‍ल दशमीला सुर्याने घोडा या वाहनासह मघा नक्षत्रात प्रवेश केला होता. त्या वेळी फारसा पाऊस झाला नाही. यंदा सुर्याने श्रावण कृष्ण शष्टी-सप्तमीला कोल्हा या वाहनासह मघा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, कोकणात ठिकठिकाणी जोरदार तर मराठवाड्यातही बहुतेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.

जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चारही महिन्यांचे पाऊसमान विचारात घेता पावसाची ठराविक पद्धत किंवा सरासरी आहे. त्यात यंदा मोठ्या प्रमाणात बदल दिसत आहेत. ऊन, पाऊस, इंद्रधनुष्य असे सर्व प्रकार श्रावणात सुरु असतात. नेहमीच्या श्रावणापेक्षा यंदा सुर्यप्रकाशाचा कालावधी कमी आहे. सलग पाऊस नाही पण दोन तीन तास जोरदार होतो आणि पुन्हा आभाळ मोकळे. अनेक ठिकाणी विजा कोसळताहेत. असे श्रावणात चित्र सहसा दिसून येत नाही. यंदा जुन व जुलैपाठोपाठ ऑगस्टमध्ये व चालू त्यातच श्रावणातील पावसाच्या पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत, अशी माहिती जेष्ठ हवामानशास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या हवामान समन्वय व सल्ला प्रकल्पाचे प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.

मघा तर मघा, वरतिच बघा
नाही तर चुल्हीपुढं बसा...
अशी म्हण संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. मघा नक्षत्राचा पाऊस कसा असतो हे त्यातून पुरेसे स्पष्ट होते. या नक्षत्रात शक्‍यतो पाऊस पडत नाही आणि पडलाच तर तो घराबाहेरही पडू देत नाही, असा त्याचा लौकीक आहे. हीच परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अनुभवास येत आहे. श्रावणाच्या मध्यावर सुर्याने मघा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. घाटमाथ्याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. येत्या 13 सप्टेंबरला सुर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करत असून त्या वेळी त्याचे वाहन घोडा असेल.
-------------(समाप्त)------------- 

No comments:

Post a Comment