Thursday, August 21, 2014

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः कर्नाटकातील चक्राकार वारे मराठवाड्यावर दाखल झाल्याने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत या दोन्ही विभागांत अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी (ता. 23) सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. कोकणात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
लक्षद्वीप बेटे व कोमोरीन परिसरात चक्राकार वारे जोरदारपणे सक्रिय झाल्याने पावसाला अनुकूल स्थिती असू,÷िअनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. मध्य प्रदेशच्या पूर्व भागापासून मराठवाडा, कर्नाटक ते केरळपर्यंतच्या भागात बुधवारी सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर गुरुवारी सकाळपर्यंत ओसरला. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टाही हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला. मात्र याच वेळी दक्षिण अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची तीव्रता वाढून शनिवारी (ता. 23) दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कर्नाटक व केरळच्या उत्तर किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मराठवाड्यावरील चक्राकार वारे आसपासच्या भागात आणखी काही काळ कायम राहिल्यास या भागात पावसाचे प्रमाण वाढू शकते, अशी माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. राज्यात सातारा येथे सर्वाधिक 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथा व कोकणाच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक होते.
राज्यात ठिकठिकाणी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः कोकण ः वेंगुर्ला, कर्जत प्रत्येकी 70, अलिबाग 50, मुंबई 30, मुरबाड, कानकोन, सुधागड, पाली प्रत्येकी 20, सावंतवाडी, खालापूर, माथेरान, चिपळून, पेण, मुरूड, मालवण, उरण, दोडामार्ग प्रत्येकी 10.
मध्य महाराष्ट्र ः सातारा 110, खंडाळा बावडा 50, सासवड 40, साक्री, गगनबावडा, जावळी, शिरूर प्रत्येकी 30, जत, मंगळवेढा, दिंडोरी, वाई, कडेगाव, बागलाण, गडहिंग्लज, अमळनेर, कळवण, कराड, दौंड प्रत्येकी 20, विटा, कर्जत, पंढरपूर, आटपाडी, चंदगड, कोरेगाव, फलटण, बारामती, शिराळा, करमाळा, भोर, हातकणंगले, वडूज प्रत्येकी 10.
मराठवाडा ः उदगीर, जळकोट, गेवराई, गंगापूर, खुलताबाद, भोकरदन प्रत्येकी 20, खंदार, बीड, पाटोदा, सिल्लोड, फुलंब्री, नायगाव खुर्द, कन्नड, लातूर, घनसावंगी प्रत्येकी 10.
विदर्भ ः लाखनी 50, मंगरुळपीर 40, सेलू, सिंदखेडराजा प्रत्येकी 30, कुरखेडा, अमरावती, वाशीम प्रत्येकी 20, देसाईगंज, मोताळा, साकोली, अर्जुनी मोरगाव, मौदा, मालेगाव, तिवसा, कुही, आष्टी, मोर्शी, गोंडपिंपरी, देवळी, मानोरा, धामणगाव रेल्वे, पोंभुर्णा प्रत्येकी 10.

No comments:

Post a Comment