Saturday, August 23, 2014

एमपीएस्सीच्या घोळामुळे कृषीचे विद्यार्थी संकटात

वन सेवा पूर्व परिक्षेचे मराठी माध्यम ऐनवेळी रद्द

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल 2014 मध्ये घेतलेल्या पूर्व परिक्षेत मराठी भाषेतून परिक्षा देण्याची सुविधा ऐनवेळी रद्द केल्याने संकटात सापडलेल्या कृषी व संलग्न विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेच्या निकालास विरोध केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) दिलेल्या निर्णयानुसार या विद्यार्थांच्या नुकसानीचा विचार करुन सर्वांना मुख्य परिक्षेस बसू द्यावे, अशी मागणी परभणी, पुणे व औरंगाबाद येथिल कृषी व संलग्न विद्याशाखांच्या पदविधरांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2014 मध्ये वन सेवेच्या 282 जागांसाठी अर्ज मागविले. या जाहिरातील पूर्वपरिक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषा असल्याचे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात 27 एप्रिलला फक्त इंग्रजी भाषेतूनच परिक्षा घेण्यात आली. यामुळे मराठी माध्यम निवडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. यापैकी दानिश पठाण व इतर विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आयोगाने कायदेशीर मुद्‌द्‌यांचा खल न करता पूर्वपरिक्षेचा निकाल लागल्यावर परिक्षार्थींनी तक्रार केल्यास त्याचा विचार करावा व त्यांना कसा दिलासा देता येईल हे ठरवावे, असा निर्णय मॅटने 11 ऑगस्टला निर्णय दिला.

आयोगाने पूर्व परिक्षेचा निकाल या निर्णयाच्या अधिन राहून जाहिर केलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आक्षेप असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेस बसु द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परभणी, पुणे, अकोला, औरंगाबाद आदी भागातील सुमारे 500 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत लोकसेवा आयोगास वैयक्तिक व सामुहिक तक्रारी नोंदविल्या आहेत. अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाईलवरुन लोकसेवा आयोगाकडे प्रतिक्रीया नोंदवाव्यात, असे आवाहन परभणी येथिल स्पर्धा परिक्षा मंचामार्फत करण्यात आली आहे.

दरम्यान, एमपीएस्सीमार्फत वन सेवा पुर्व परिक्षेचा निकाल 20 ऑगस्टला जाहिर झाला आहे. पुणे केंद्रातून दोन हजार 292, औरंगाबादमधून 512, नागपूरहून 373 व मुंबईतून 326 असे एकूण तीन हजार 503 विद्यार्थी मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. मुख्य परिक्षा 27 सप्टेंबरला पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूर या चार केंद्रांवर घेण्यात येणार आहे. पूर्व परिक्षेच्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधिन राहून मुख्य परिक्षेस प्रवेश देण्यात येईल, असे एमपीएस्सीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------- 

No comments:

Post a Comment