Thursday, August 28, 2014

अष्टविनायकांपासून आज "जलदिंडी'ला प्रारंभ

अवघा महाराष्ट्र सज्ज; राज्यभर होणार जलजागर

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्रावरील पाणी प्रश्‍नांचे विघ्न कायमचे दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समुहाने आयोजित केलेल्या जलदिंडीला आज (ता.28) गणरायाच्या आशिर्वादाने अष्टविनायकांचे पवित्र तिर्थ सोबत घेऊन प्रारंभ होणार आहे. राज्यभर जलदिंडीची उत्सूकता शिगेला पोचली असून दिंडीमार्गावरील ग्रामस्थ स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अष्टविनायकांपासून निघणाऱ्या या जलदिंड्या पुढील चार दिवस राज्यभर जलजागर व जलजागृती करणार आहे.

मुंबईत पार पडलेल्या वॉटर लॅबमध्ये तयार झालेल्या दुष्काळमुक्ती आणि पाणी प्रश्‍न सोडविण्याच्या 32 उपाययोजना राज्यभर पोचवून त्याबाबत जनमत तयार करण्यासाठी नऊ जलदिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. रांजणगावहून दोन तर उर्वरीत अष्टविनायकांच्या ठिकाणांहून प्रत्येकी एक जलदिंडी निघणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात 31 ऑगस्टपर्यत अष्टविनायकांच्या पवित्र तिर्थाच्या रुपाने पाणी प्रश्‍न सोडविण्याचा वसा देत या दिंड्या संपूर्ण महाराष्ट्रभर जलजागर करणार आहेत. अनेक गावे, संस्था, मंडळे, महिला गट, शेतकरी गट, युवा मंडळे, महाविद्यालये, शाळा, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, संघटना या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सक्रीय सहभागी होणार आहेत. फिनोलेक्‍स पाईप्स हे या अभियानाचे मुख्य प्रायोजक तर नेटाफिम इरिगेशन हे सहप्रायोजक आहेत.

जलदिंडीच्या निमित्ताने राज्यभर पाणी प्रश्‍नांवर जागृतीचे उपक्रम सुरु असून जलदिंडी सुरु होण्यापुर्वीच या उपक्रमांचा जागर टिपेला पोचला आहे. राज्यभरातील अनेक गावे, नगरपालिकांनी जलदिंडीमध्ये सक्रीय सहभागी होण्याची घोषणा व तयारी यापुर्वीच केली आहे. काही संस्थांनी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी गावे दत्तक घेण्याचीही घोषणा केली आहे. अनेकांनी आर्थिक मदतही जाहिर केली आहे. काही संस्थांनी नळांना तोट्या बसविण्यासारख्या उपक्रमांची अंमलबजावणीही सुरु केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी वॉटर लॅबमधील उपययोजनांनी अंमलबजावणी शासनाने करावी, यासाठी पाठींबा दर्शविणारे ठराव संमत केले आहेत. शाळा, मदरशे, विद्यालये, महाविद्यालये, कृषी व संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पाणी वापर व नियोजनाबाबत विशेष प्रबोधन करण्यास सुरवात केली असून विद्यार्थी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी सक्रीय योगदान देण्याची शपथ घेत आहेत.

तनिष्का महिला गटामार्फत जलदिंडीच्या मार्गावर प्रबोधनपर सांस्कृतीक कार्यक्रमांसह विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीमार्गावरील ग्रामस्थांमार्फत गुढ्या उभारून दिंडींचे स्वागत करण्यात येणार आहे. हिंदु, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन, कोळी आदी विविध जाती धर्म समुदाय व संघटनांबरोबरच रिक्‍शा चालक, शिक्षण, दुकानदार, व्यवसायिक, बॅंजो वादक, ढोल पथके, जलमित्र, मोलकरीन, शिक्षक, छायाचित्रकार, वकील, डॉक्‍टर, आयटी, मजूर, एनसीसी, स्काऊड गाईड, मुर्तीकार, शासकीय कर्मचारी, देवस्थाने, व्यापारी यांच्या संघटना आणि महासंघांनीही जलदिंडीला पाठींबा व्यक्त केला असून ते या उपक्रमात सक्रीय सहभागी होणार आहेत.
----------- 

No comments:

Post a Comment