Saturday, August 23, 2014

विखे पाटील जन्मदिन आता शेतकरी दिन

पुणे (प्रतिनिधी) ः सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी भरिव कार्य केलेले जेष्ठ नेते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस यापुढे राज्यभर दर वर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याच्या कृषी विभागाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. यंदा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये शेतकरी दिन साजरा करण्यासाठी कृषी विभागाच्या निधीतून चार कोटी 44 लाख 14 हजार रुपये खर्च करण्यासही राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

राज्यात विविध विभागांमार्फत कामगार दिन, महिला दिन, आरोग्य दिन, बाल दिन, कृषि दिन असे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. मात्र राज्यातील जनतेची अन्नधान्य, फळे, भाजीपाल्याची गरज भागविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात कोणताही विशेष असा दिवस साजरा केला जात नाही. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक उंची वाढविण्यासाठी भरिव कार्य केले. त्याबद्दल त्यांना पद्मश्री, डॉक्‍टरेट आदी सन्मान बहाल करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून विखे पाटील यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याच्या कृषी विभागाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू होत.

शेतकरी दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चहापाणी, मंडप, हारतुरे, फोटो, फ्लेक्‍स, प्रदर्शन आदी बाबींवरील खर्चासाठी गावपातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक हजार 500 रुपये याप्रमाणे 27 हजार 906 ग्रामपंचायतींसाठी चार कोटी 18 लाख 59 हजार रुपये, तालुका स्तरावरील कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्‍यास दोन हजार 500 रुपये याप्रमाणे 356 तालुक्‍यांना आठ लाख 90 हजार रुपये तर जिल्हा स्तरीय कार्यक्रमासाठी प्रति जिल्हा पाच हजार रुपये याप्रमाणे 33 जिल्ह्यांसाठी एक लाख 65 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी दिनाच्या प्रचार व प्रसिद्‌धीसाठी आणखी 15 लाख रुपये खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. हा सर्व खर्च कृषी आयुक्तांच्या स्तरावर उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यात यावा, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले असून याबाबतच्या मार्गदर्शक सुचना तयार करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत.
------------------ 

No comments:

Post a Comment