Wednesday, August 20, 2014

कृषीमंत्र्यांच्या संस्थेला कृषीरत्न पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी) ः राज्य शासनाने पाच दिवसांपुर्वी कृषी क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठीचे सर्व पुरस्कार जाहिर केल्यानंतर कृषी विभागाच्या "खास' आग्रहास्तव खुद्द राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या "प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऍण्ड एज्युकेशन इन नॅचरल ऍण्ड सोशल सायन्सेस' (राहता, नगर) या संस्थेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पुरवणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

राज्याच्या कृषीविषयक पुरस्कारांच्या इतिहासात यंदा प्रथमच पुरवणी पत्राद्वारे यापुर्वी जाहिर झालेल्या पुरस्कारांमध्ये अधिक पुरस्कारार्थींची भर टाकल्यात आली आहे. त्यातही ही भर कृषीमंत्र्यांच्याच संस्थेची आहे, हे विशेष. याबरोबरच कोतुळ (अकोले, नगर) येथिल सदाशिव गोपाळराव पोखरकर यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार तर अनंत दिगंबर प्रभुआजगांवकर (आडेली, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग), सुरेश काशिनाथ कदम (नेऊरगाव, येवला, नाशिक) व भारत एकनाथ शिंदे (बोरी, इंदापूर, पुणे) यांना 2013 साठीचे उद्यानपंडीत पुरस्कार जाहिर झाले आहेत.

कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी 1984 मध्ये प्रवरा इन्स्टिट्यूटची स्थापना केली. राधाकृष्ण विखे पाटील हे या संस्थेचे विश्‍वस्त आहेत. संगणक व्यवस्थापन, अंगणवाडी प्रशिक्षण, स्वयंरोजगार प्रशिक्षण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेमार्फत 1992 मध्ये बाभळेश्‍वर (ता. रहाता) येथे कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. या कृषी विज्ञान केंद्राने अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले असून त्यासाठी त्यांना 2000 सालचा देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्राचा पुरस्कार मिळालेला आहे.
------------------- 

No comments:

Post a Comment