Friday, August 1, 2014

चुकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयाचा लगाम

पुणे (प्रतिनिधी) ः बदली किंवा पदोन्नती होताना "सोई'चे ठिकाण मिळाले नाही म्हणून नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न होता महिनो न्‌ महिने रजेवर जाणाऱ्या चुकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगाम घालून शिस्तभंगाबद्दल कारवाईच्या बडग्याने वठणीवर आणनारी नवी नियमावली कृषी आयुक्तालयामार्फत नुकतिच लागू करण्यात आली आहे. यामुळे यापुढे कृषी विभागात संचालक, सहसंचालक, अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागिय कृषी अधिकारी, उपसंचालक व बीज परिक्षण अधिकारी या पदांवर काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मनमर्जीपणे रजेवर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

काही अधिकारी किरकोळ, अर्जित, वैद्यकिय कारणास्तव परावर्तीत रजा संदर्भात सक्षम प्राधिकाऱ्यांकडून रजा मंजूर करुन न घेता परस्पर स्वतःच्या सोयीनुसार अनुपस्थित राहतात आणि नंतर विलंबाने रजेचा अर्ज सादर करतात. त्याचप्रमाणे बदलीनंतर, पदोन्नतीनंतर इच्छित ठिकाणी पदस्थापना न मिळाल्यास ते पूर्वीच्या पदावरुन कार्यमुक्त होऊन पदलीचे किंवा पदोन्नतीच्या पदावर पदग्रहण अवधी समाप्त झाल्यानंतरही हजर होत नाहीत. अशा अधिकाऱ्यांना नियमानुसार वेतन किंवा रजा वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही. पदग्रहण अवधी संपल्यानंतर बुद्धिपुरस्सर अनुपस्थित राहणे हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1981 नुसार गैरवर्तन आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अधिकाऱ्यांसाठी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

कृषी आयुक्तालयामार्फत "अ' वर्ग अधिकाऱ्यांच्या विविध प्रकारच्या रजांबाबत नवीन नियमावलीनुसार कार्यवाही सुरु झाली आहे. यानुसार राज्यातील कोणत्याही "अ' वर्ग अधिकाऱ्याला किमान सात दिवस आधी आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय रजेवर जाता येणार नाही. त्याने तसे केल्यास अधिकाऱ्यांच्या या कृतीस गैरवर्तन समजून त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. विना परवानगी रजा काळाची सेवा खंडीत करणे, पुढील एक पदोन्नती, पगारवाढ रोखणे आदी प्रकारची कारवाई होणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून या पद्धतीने रजांची कार्यवाही सुरु झाली असून आस्थापना विभागामार्फत याबाबतच्या कार्यवाहीचे संनियंत्रण करण्यात येत आहे.

चौकट
- "त्यांना' कारणे दाखवा नोटीसा
कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाने राज्यातील सर्व कृषी कार्यालयांना नुकतेच एक परिपत्रक पाठवून गेल्या तीन महिन्यात बदलीच्या अथवा पदोन्नतीच्या ठिकाणी निर्धारीत वेळेत रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावरुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आस्थापना विभागाच्या सुत्रांनी दिली.
------------------------ 

No comments:

Post a Comment