Wednesday, August 20, 2014

कृषी विस्तारासाठी स्वतंत्र एनआरसी !

आयसीएआरच्या विस्तार विभागाचा प्रस्ताव; पुण्यात स्थापनेसाठी हालचाली

पुणे (प्रतिनिधी) ः द्राक्ष, कांदा व लसूण पिकांपाठोपाठ आता कृषी विस्तारासाठीचे स्वतंत्र राष्ट्रीय संशोधन केंद्र (एनआरसी) पुण्यात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) विस्तार विभागाने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे सुमारे सहा महिन्यांपूर्वीच सादर केला आहे. मात्र आता सत्तापालट झाल्याने हा प्रस्ताव सध्या प्रस्तावित अवस्थेत आहे.
देशात सध्या पीकनिहाय अनेक राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये त्या त्या पिकाच्या वा संशोधनाच्या अनुषंगाने विस्तार तंत्रज्ञानाबाबतही संशोधन होते. मात्र देशात कोठेही कृषी विस्तारासाठीचे स्वतंत्र संशोधन केंद्र कार्यरत नाही. या पार्श्‍वभूमीवर देशासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून पुण्यात कृषी विस्ताराचे राष्ट्रीय संशोधन केंद्र असावे असा मुद्दा पुढे आला असून, त्यासाठी आयसीएआरच्या विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे.

- आळंदीची जागा देण्यास आयुक्तालय तयार
भारतीय कृषी संशोधन संस्थेमार्फत कृषी विस्तारासाठी स्वतंत्र राष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असेल तर त्यासाठी पुण्यात आळंदीजवळील चऱ्होली येथील कृषी विभागाची जागा त्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी कृषी आयुक्तालयाने दाखवली आहे. आयसीएआरचे उपमहासंचालक (विस्तार) डॉ. किरण कोकाटे व कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या नुकत्याच बैठकीत याबाबत चर्चा झाली. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर चऱ्होली येथील ही जागा या केंद्रासाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद डॉ. कोकाटे यांनी या वेळी व्यक्त केला.

- पुण्यातील जागा पुन्हा चर्चेत
कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या मोक्‍याच्या ठिकाणच्या जागा हा विषय यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून या जागांची मागणी सातत्याने होत आहे. चऱ्होली येथे कृषी विभागाची सुमारे 32 एकर जागा आहे. यापैकी सुमारे 20-22 एकर जागा सध्या मोकळी असून त्यावर अनेकांचा डोळा आहे. महापालिकेमार्फतही त्यावर आरक्षणे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही बाजूंनी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न चालवला आहे, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली.

- संशोधन केंद्रांतील विस्तार कमकुवत
कृषी विस्तारासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या संशोधन केंद्राची कृषी विस्ताराची बाजू अधिक बळकट करावी, अशी मागणी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञांनी केली आहे. आयसीएआरच्या संशोधन केंद्रांबरोबरच विद्यापीठांच्या संशोधन केंद्रांचीही विस्ताराच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात दुरवस्था आहे. ती दूर करण्यास प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे.

- केव्हीकेंची कार्यक्षमता वादात
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक-दोन कृषी विज्ञान केंद्रे सुरू होत आहेत. आयसीएआरच्या विस्तार विभागामार्फत हे काम सुरू आहे. आत्तापर्यंत सुरू झालेल्या केंद्रांपैकी बाभळेश्‍वर, बारामती यासह काही ठिकाणची केंद्रे चांगली काम करत आहेत. मात्र, बहुसंख्य केव्हीकेंचे काम समाधानकारक नाही. आमच्या पाहणीनुसार विदर्भ, मराठवाड्यातील काही कव्हीकेंची फाटकेही उघडली जात नाहीत, अशी अवस्था आहे. यामुळे केव्हीकेंचे बळकटीकरण आणि कार्यक्षमता वाढ अधिक महत्त्वाची आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

- विद्यापीठांचे विस्तार विभाग
देशातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विस्तार प्रशिक्षण, संशोधन व शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. मात्र या ठिकाणच्या संशोधकांना मुख्य कामापलीकडची इतर कामे सांभाळता सांभाळता मूळ कामासाठी वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या विस्तार विभागातील प्राध्यापक संशोधकांचे हे दुखणे आहे. विद्यापीठ पातळीवर माहिती केंद्रे उभारण्यात आली आहेत; मात्र त्यांचे कार्य फक्त दैनंदिनी काढणे आणि उत्पादने विकण्यापुरते मर्यादित राहिले आहे. आयसीएआरने विद्यापीठांची शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी गेली पाच वर्षे विशेष प्रयत्न केले. आता आयसीएआरमधील दिल्लीकरांनी विद्यापीठांचे विस्तार विभाग बळकट करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, असे मत माजी कुलगुरूंनी व्यक्त केले.

- विस्तार शिक्षण, व्यवस्थापन संस्था
आनंद, हैदराबाद, हिस्सार यासह देशपातळीवर चार ठिकाणी विभागीय पातळीवर विस्तार शिक्षण संस्था कार्यरत आहेत. आनंद (गुजरात) येथील कृषी विस्तार संस्था ही महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दादरा व नगर हवेली, दीव व दमण आणि छत्तीसगड या राज्यांसाठीची ही संस्था आहे. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम या संस्थेमार्फत राबविला जातो. याशिवाय हैदराबाद येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर एक्‍स्टेन्शन मॅनेजमेंट ही राष्ट्रीय पातळीवरील कृषी विस्तार व्यवस्थापनाची संस्था कार्यरत आहे.

No comments:

Post a Comment