Thursday, August 28, 2014

राज्यभर पावसाचा जोर वाढणार


पुणे (प्रतिनिधी) ः आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात बंगालच्या उपसागरालगत सक्रीय असलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीवर सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने शुक्रवारी (ता.29) मराठवाड्यात तर शनिवारी (ता.30) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दोन्ही दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

आंध्र प्रदेशचा उत्तर भाग व आदिशाच्या दक्षिण समुद्री भागावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. या क्षेत्राशी संलग्न असलेले चक्राकार वारे हवेच्या वरच्या थरात कायम आहेत. या कमी दाबाच्या क्षेत्राती तिव्रता शुक्रवारी सकाळपर्यंत आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भासह महाराष्ट्र सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे. याच वेळी मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टाही त्याच्या मुळ स्थानाच्या जवळपास म्हणजेच अनुपगड, धोलपूर, झाशी, जबलपूर, रायपूर ते उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रापर्यंत सक्रीय आहे. या पट्ट्याच्या व कमी दाबाच्या क्षेत्राच्या एकत्रित प्रभावामुळे पुढील दोन दिवसात मध्य भारतातही पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे दक्षिण कोकणापासून केरळपर्यंत किनारी कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. मात्र त्याची तिव्रता गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी झालेली आहे. सौराष्ट्र, कच्छ व अरबी समुद्राच्या उत्तर भागात समुद्रसपाटीच्या पातळीहून दीड व साडेतीन किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. राज्यात सर्वत्र आकाश बाष्पयुक्त ढगांनी ढगाळलेले असून ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मराठवाडा व विदर्भात ढगांची दाटी अधिक आहे.
---------- 

No comments:

Post a Comment