Wednesday, May 6, 2015

कृषी गणना विशेष - भाग 1

लहान शेतकऱ्यांच्या
संख्येत झपाट्याने वाढ

दरवर्षी दीड लाख अत्यल्प भूधारकांची पडते भर

...असे घटत आहे क्षेत्र
घटक --- 2000-01 --- 2010-11
वहितीखालील क्षेत्र (लाख हेक्‍टर) --- 201.02 --- 197.67
जमीनधारक संख्या (लाख) --- 121 --- 136
सरासरी जमीनधारणा --- 1.66 --- 1.44

संतोष डुकरे
पुणे ः राज्यातील कृषी गणनेचा 2010-11 या प्रमाण वर्षाच्या कृषी गणनेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. राज्यातील अत्यल्प भूधारकांच्या संख्येत दर वर्षी तब्बल दीड लाखांची भर पडत असल्याचे धक्कादायक वास्तव या गणनेतून पुढे आले आहे. अवघ्या दहा वर्षांच्या कालखंडात अत्यल्प भूधारकांच्या संख्येत 14 लाखांची, तर अल्पभूधारकांच्या संख्येत चार लाख 50 हजारांची भर पडली आहे.

कृषी गणनेच्या जमीनधारक व धारणा क्षेत्र मोजणीच्या निष्कर्षांनुसार राज्यात 2001-02 ते 2010-11 या दहा वर्षांच्या कालावधीत अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या 18 लाख 50 हजारांनी वाढली आहे. याउलट मोठे भूधारक 19 हजारांनी, मध्यम भूधारक दीड लाखाने, तर अर्ध मध्यम भूधारकांची संख्या सव्वा लाखाने कमी झाली आहे. राज्यातील एकूण भूधारकांच्या संख्येत एक कोटी 21 लाखांवरून एक कोटी 36 लाखांपर्यंत वाढ झाली आहे.

- 49 टक्के लोकांकडे फक्त 16 टक्के जमीन
राज्यात एकूण एक कोटी 97 लाख 67 हजार हेक्‍टर शेतजमीन आहे. सर्वाधिक 49 टक्के लोक अत्यल्पभूधारक असून, त्यांच्याकडे एकूण शेतजमिनीच्या फक्त 16 टक्के जमीन असल्याची स्थिती आहे. याशिवाय 29 टक्के अल्पभूधारकांकडे 29 टक्के, 15.7 टक्के अर्ध मध्यम भूधारकांकडे 29 टक्के, पाच टक्के मध्यम भूधारकांकडे 20 टक्के, तर अर्ध्या टक्‍क्‍याहून कमी असलेल्या मोठ्या भूधारकांकडे साडेपाच टक्के शेतजमीन असल्याचे चित्र आहे.

- सरासरी जमीन धारणा 1.44 हेक्‍टरवर
राज्यातील शेतीच्या भाऊवाटण्या, खरेदी-विक्री, तुकडेवारी, विभाजनामुळे शेतजमीन धारकांच्या सरासरी जमीन धारणेत सातत्याने घट सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या 40 वर्षांत सरासरी धारणा 4.28 हेक्‍टरवरून 1.44 हेक्‍टरपर्यंत खाली आली आहे. गेल्या दशकात ही घट 22 गुंठ्यांची, तर 2005 पासून 2010 अखेर ती दोन गुंठ्यांची आहे. सरासरी जमीन धारणेतील ही घट सर्वाधिक चिंताजनक बाब मानली जात आहे.

*चौकट
भूधारणा --- भूधारक संख्या --- धारण केलेली जमीन (हेक्‍टर)
अत्यल्प (1 हेक्‍टरहून कमी) --- 67,09,034 --- 3185931.40
अल्प (1 ते 2 हेक्‍टर) --- 40,52,317 --- 5739050.46
अर्ध मध्यम (2 ते 4 हेक्‍टर) --- 21,59,109 --- 5765450.16
मध्यम (4 ते 10 हेक्‍टर) --- 7,10,591 --- 3992777.03
मोठी (10 हेक्‍टरहून अधिक) --- 67,914 --- 1083851.88
एकूण ---- 1,36,89,965 --- 1,97,67,060.93 

No comments:

Post a Comment