Wednesday, May 13, 2015

पशुधनाच्या मॉन्सूनपूर्व लसिकरणाला प्रारंभ

- मे अखेर टोचणार 4 कोटी लसी

*चौकट
- असे होणार लसीकरण
गाय व म्हैस ः घटसर्प, फऱ्या
शेळी व मेंढी ः आंत्रविषार, मेंढीचा देवी
कोंबडी ः मानमोडी, देवी, लासोटा

पुणे (प्रतिनिधी) ः पावसाळा सुरु झाल्यानंतर जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवतात. या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून राज्यात ठिकठिकाणी तिला प्रारंभ झाला आहे. येत्या पंधरा दिवसात विविध आजारांवरील सुमारे चार कोटी लसी गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदींना पाळीव पशुपक्षांना देण्यात येणार आहेत. यातही गेल्या काही वर्षात प्रादुर्भाव आढळलेल्या भागात लसीकरणावर अधिक भर देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनुक्रमे 75 व 25 टक्के निधीतून हे लसिकरण होणार आहे.

राज्यातील पशुधनाच्या संख्येनुसार पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाचे तालुकानिहाय, जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले असून त्यानुसार लसींचा पुरवठा सुरु आहे. गाय व म्हशींसाठी घटसर्प आणि फऱ्या, शेळी व मेंढ्यांना आंत्रविषार व देवी, कोंबड्यांना मानमोडी, देवी व लासोटा तर वराहांना वराहज्वर या आजारांसाठीच्या प्रतिबंधक लसी टोचण्यात येणार आहेत. मागणी व नियोजनानुसार सर्व प्रकारच्या लसी पूरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्यांचा पुरवठाही सुरळीत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. ए. टी. कुंभार यांनी दिली.

सर्वसाधारणपणे संकरीत पशुधन असलेले पशुपालक आवर्जून लसीकरण करतात. मात्र देशी वंशाचे पशुधन असलेले पशुपालन, शेळी व मेंढीपालक लसीकरणाकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः आदिवासी पाडे, वाड्या वस्त्या बहुधा लसीकरणाकडे पाठ फिरवतात. याची नुकसानीमुळे अनेकदा मोठी किंमत मोजावी लागते. राज्यातील सर्व जनावरांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व लसी मोफत पुरविण्यात येत आहेत. पशुपालकांनी सकाळी जणावरे सोडण्याआधी किंवा ती घरी येतील तेव्हा स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्‍टरांना लसीकरणासाठी बोलावून घ्यावे. एकट्या डॉक्‍टरला जणावर आवरु शकत नाही. त्यामुळे जनावराला लस देण्यासाठी डॉक्‍टरांना योग्य सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. कुंभार यांनी केले आहे.

*चौकट
- लाळ्या खुरकत लसीकरण पूर्ण
राज्यातील गाई म्हशींमधील लाळ्या खुरकत व शेळ्या मेंढ्यांच्या पीपीआर रोगांवरील प्रतिबंधात्मक लसीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. एक ते 30 एप्रिलदरम्यान यासाठीचे लसीकरण करण्यात आले. या कालावधीत राज्यात एक कोटी 88 लाख लाळ्या खुरकत लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यातील सुमारे 95 टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. याशिवाय एक कोटी 33 लाख शेळ्या मेंढ्यांपैकी सुमारे 30 टक्के संख्येला म्हणजेच सुमारे 40 लाख करडे व कोकरांना पीपीआर च्या लसी देण्यात आल्याची माहीती पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत देण्यात आली.

*कोट
""रानात गेलेले जनावर वा स्थलांतरीत शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण राहीले तरी रोग प्रादुर्भावाचा धोका उद्भवतो. यामुळे पशुपालकांनी शासकीय पशुवैद्यकाला बोलावून घेवून जनावरे मोकळी सोडण्याआधी किंवा स्थलांतर करतानाही सर्व जनावरांना लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणासाठी पुढाकार घेवून पशुवैद्यकांना सहकार्य करावे.''
- डॉ. ए. टी. कुंभार, पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र राज्य
---------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment