Tuesday, May 26, 2015

खरिपासमोर आव्हान आपत्तीचे!



आपत्कालीन नियोजन ढेपाळलेले; सुधारणांची शेतकऱ्यांची मागणी

पुणे (प्रतिनिधी) : कृषी विभागाने खते, बियाणे, औषधे पुरवठा व गुणवत्ता नियंत्रणाचे नियोजन केले असले, तरी भारतीय हवामान विभागाच्या कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने बियाणे व इतर मदत देण्याबरोबरच पावसाच्या नोंदी, पीक विमा व आपत्ती निवारणाच्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी विद्यापीठांच्या मदतीने कृषी विभाग जिल्हानिहाय खरीप आपत्कालीन नियोजन तयार करत असला तरी गेली अनेक वर्षे जुनेच नियोजन पुढे दाखविण्याचा प्रकार जाहिरपणे सुरू आहे. कृषी विभागाच्या संकेतस्थळावरही आपत्तकालीन नियोजनामध्ये २०११ सालच्या खरिपासाठीचेच आपत्कालीन नियोजन कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजेच गेली अनेक वर्षे आपत्कालीन नियोजनात बदल झालेला नाही. याच कालखंडात आपत्तींच्या स्वरूपात आणि परिणामांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे, हे विशेष. या बदलांची दखल आपत्कालीन नियोजनात घेतली गेली नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे संभाव्य आपत्ती व त्यानुसार आपत्ती निवारण आणि शेतकरी बळकटीककरण या दृष्टीने राज्य शासनाने अद्याप कोणताही प्रकारचा कृतिआराखडा जाहीर केलेला नाही.

कापसाच्या बरोबरीने राजातील सर्वांत मोठे पीक असलेल्या सोयाबीन बियाण्याची स्थिती कागदावर समसमान असली तर प्रत्यक्षात सारं काही आलबेल नाही. नवीन बियाण्याची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी कृषी विभाग घरचे बियाणे पेरण्याचा आग्रह करत आहे. मात्र, यात कंपन्यांच्या व घरगुती बियाण्याच्या बाबतीतही गेल्या काही वर्षांप्रमाणे उगवणीचा प्रश्न उद्भवण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. अशात दुबार पेरणीची वेळ आल्यास कृषी विभागासमोर बियाणे पुरवठ्याचे आव्हाण सर्वांत मोठे असेल.

कमी-अधिक पावसाने निम्म्या हंगामातच पीक उद्‍ध्वस्त झाले तर काय, हा प्रश्न गेल्या काही वर्षांत उग्र रूप धारण करू लागला आहे. मात्र, त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची मदत यंत्रणा कृषी विभागामार्फत सक्रिय करण्यात आलेली नाही. पिकाच्या पेरणीबरोबरच किमान पहिला दोन महिन्यांत नष्ट होणाऱ्या, हातच्या जाणाऱ्या पिकांचीही नोंद घेणात यावी व त्यानुसार संबंधित आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कमी कालावधीची पिके, चारा पिके यांचे बियाणे व इतर निविष्ठा उपलब्ध करून दाव्यात, खतांच्या धर्तीवर राज्यात बियाण्याचाही संरक्षित साठा करण्यात यावा व हा साठा दुबार पेरणीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
---- ----- ---- -----
निसर्गाचं दुष्टचक्र झालंय. खरिपाचं पीकच हाती लागायला तयार नाही. अशा वेळी आपत्तीत बियाणे मिळायला हवे. यंदा किमान प्रत्येक गावात पर्जन्यमापक तरी बसवावे. यामुळे पावसाची आणि नुकसानीची खरी माहिती तरी मिळेल व शासनाला न्याय मिळेल.
- रघुनाथ शिंदे, अध्यक्ष, श्री. क्षेत्रपाल कृषी विज्ञान मंडळ, खैरेनगर, शिरूर, पुणे
---- ----- ---- -----
खरिपात पीक हातचं जातंय. आम्ही लोकांना विमा संरक्षण घेणाचा अाग्रह करतो पण विमाच फसवा आहे. सुरवातीला लालूच दाखवतात व नंतर पेमेंट कमी करतात. पिकंही जातंय आणि पैसेही मिळत नाहीत. शासनाची आपत्तीत मदतीची धोरणे चुकीची होत आहेत, त्यात सुधारणा व्हायला हवी.
- बालाजी इंगोले, मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड
---- ----- ---- -----

No comments:

Post a Comment