Wednesday, May 13, 2015

राज्याची 19 वी पशुगणना पूर्ण

लवकरच अहवाल प्रसिद्ध; पुढील गणनेची तयारी सुरू

पुणे (प्रतिनिधी) ः पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेली 2012 वर्षासाठीची पशुगणना पूर्णत्वास गेली असून येत्या पंधरा दिवसात गणनेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच वेळी 2017 मध्ये होणाऱ्या पुढील (20 व्या) पशुगणनेची तयारीही आयुक्तालयामार्फत सुरू करण्यात आली असून गावनिहाय अहवाल हे या गणनेचे वैशिष्ट्य राहणार आहे.

राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. ए. टी. कुंभार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 2012 या वर्षीच्या 19 व्या पशुगणनेची बहुतेक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गणनेच्या निष्कर्षांना मंजुरी देण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात या गणनेचा अहवाल हाती येईल. अहवाल हाती आल्यानंतरच त्यातील निष्कर्षाविषयी बोलता येईल. मात्र ही गणना पूर्ण होतानाच पुढील गणनेची तयारी सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जिल्हा व तालुका पातळीपर्यंत गणनेचा अहवाल तयार करण्यात येतो. येत्या गणनेत गावनिहाय अहवाल तयार करण्याचा प्रयत्न असून यासाठी केंद्राकडे विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे.

गावनिहाय पशुगणना करण्यासाठी केंद्र शासनामार्फत पशुसंवर्धन विभागाला संगणकीकृत ऍप्लिकेशन विकसित करून देण्यात येणार आहे. याद्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक गावातील पशुसंवर्धनविषयक इत्यंभूत माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या पशुगणनेची जिल्हानिहाय, तालुके व गावांची माहिती संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागांना सीडी द्वारे देण्यात येणार आहे. गावपातळीवरील पशुधनविषयक इत्यंभूत माहीती सर्वच विभागांना उपलब्ध झाल्यास नियोजन व अंमलबजावणीचे काम अधिक काटेकोर होऊ शकेल, असे डॉ. कुंभार यांनी सांगितले.
----------------------

No comments:

Post a Comment