Friday, May 15, 2015

मांजरीत 20, 21 ला इटालियन कृषी यंत्रे प्रात्यक्षिके

मराठा चेंबर व इंडो इटालियन चेंबर मार्फत आयोजन

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील द्राक्ष, डाळिंब, केळी आदी फळबागा व पिकांच्या यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या पुढाकाराने मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेत इटलीतील प्रगत कृषी यंत्रांची प्रात्यक्षिके, चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले आहे. येत्या 20 व 21 मे ला ही प्रात्यक्षिके होणार आहेत. याच बरोबर यंत्र उत्पादक, शेतकरी, उद्योजक यांच्या बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे.

मराठा चेंबरच्या पुढाकाराने व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन हॉर्टीकल्चर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघाच्या विशेष प्रयत्नातून इंडो-इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्री (आयआयसीसीआय, मुंबई) व इटालियन फार्म मशिनरी मॅन्युफॅक्‍चरर फेडरेशन (इटली) यांच्यामार्फत या प्रदर्शन, प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख व चेंबरच्या कृषी विभागाचे प्रमुख सोपान कांचन यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.

इटलीतील आघाडीच्या 11 कृषी यंत्र उत्पादक कंपन्या या प्रदर्शनात सुमारे 10 एकर पीक क्षेत्रात यांत्रिकीकरणाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. सुमारे 70 हून अधिक प्रकारची अत्याधुनिक बहुउपयोगी यंत्रे कंपन्यांमार्फत यावेळी वापरून दाखविण्यात येणार आहेत. यात आंतरमशागत, फवारणी, खत वापर, तणकाढणी, धुरळणी, ट्रान्स्पोर्टर, कटर, कॅनोपी मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट याबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात वापर करताना पाहता येईल. यातील बहुसंख्य यंत्रे ही ट्रॅक्‍टर चलीत असून प्रात्यक्षिकांसाठी राज्यात वापरले जाणारे विविध प्रकारचे ट्रॅक्‍टर उपलब्ध करण्यात आले आहेत.

कृषी यांत्रिकीकरणात इटालियन कंपन्यांचा दर्जा चांगला आहे. गेल्या काही वर्षात राज्यात यातील काही कंपन्यांचे तंत्रज्ञान, यंत्रे यशस्वी व लोकप्रिय झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा, यंत्रांचा वापरू करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुण्यात आयोजित प्रात्यक्षिके ही सुवर्णसंधी आहे. शेतकऱ्यांनी त्यांना हवी ती यंत्रे गटांच्या माध्यमातून घ्यावीत. यासाठी शासनामार्फत 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदानही उपलब्ध आहे. यातून राज्याच्या कृषी यांत्रिकीकरणाला अधिकाधिक चालना देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती श्री. कांचन यांनी दिली.

मराठा चेंबरमार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी इटलीबरोबरच इस्राईल, नेदरलॅन्ड आदी देशांसोबत विविध उपक्रमांची आखणी सुरू असल्याची माहिती श्री. सरदेशमुख यांनी दिली. राज्यभरातील शेतकऱ्यांनी ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा चेंबरमार्फत करण्यात आले आहे.
------------------ 

No comments:

Post a Comment