Tuesday, May 12, 2015

कृषी गणना विशेष - भाग 5

अनुसूचित जाती-जमातींच्या शेतजमिनीत भरीव वाढ

संतोष डुकरे
पुणे - राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शेतजमिनीत व जमीनधारकांमध्ये गेल्या दहा वर्षांत भरीव वाढ झाली आहे. जमीनधारकांबरोबरच जमिनीतही वाढ झाल्याने सरासरी जमीनधारणेत फारसा बदल झालेला नाही. राज्यात अनुसूचित जातींच्या शेतकऱ्यांकडे 7.52 टक्के, अनुसूचित जमातींच्या शेतकऱ्यांकडे 6.30 टक्के, संस्थांकडे 0.18 टक्के तर इतरांकडे 86 टक्के शेतजमीन आहे.

गेल्या तीस वर्षांत म्हणजेच 1980-81 पासून अनुसूचित जातींच्या जमीनधारक व वहिती क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. जमीनधारकांची संख्या तीस वर्षांत दुपटीहून अधिक वाढ होऊन 10 लाखांच्या पुढे गेली तरी 2005-06 ते 10-11 या काळात सुमारे 40 हजारांनी घट झाली आहे, हे विशेष. सरासरी जमीनधारणेत या कालखंडात निचांकी 1.16 हेक्‍टरवरून 1.27 हेक्‍टरपर्यंत वाढ झाली आहे.

अनुसूचित जमातींच्या जमीनधारकांत तीस वर्षांत दुपटीहून अधिक वाढ झाली असली तरी क्षेत्र वाढीमुळे सरासरी जमीन धारणेत फारसा फरक पडलेला नाही. तीस वर्षांत 1.35 ने, दहा वर्षांत 0.17 ने कमी झाली आहे. क्षेत्रात गेल्या तीस वर्षांत सुमारे अडीच लाख हेक्‍टरने तर गेल्या दहा वर्षांत सुमारे तीस हजार हेक्‍टरने वाढ नोंदविण्यात आली आहे.

अनुसूचित जातीचे सर्वाधिक 62 हजार 332 शेतजमीनधारक सातारा जिल्ह्यात असले तरी सर्वाधिक क्षेत्र मात्र सोलापूर जिल्ह्यात 88 हजार 107 हेक्‍टर आहे. दशकभरात रायगड, नंदुरबार, पुणे, सांगली, नागपूर व हिंगोली या जिल्ह्यांमधील अनुसूचित जातींच्या जमीनधारकांत आणि त्यांनी धारण केलेल्या जमिनीत मोठी घट झालेली आहे. नागपूर व सांगलीत ही घट 30 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. इतरही अनेक जिल्ह्यांत क्षेत्रात घट नोंदविण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात राज्यात अनुसूचित जमातींचे सर्वाधिक शेतजमीनधारक (1,31,348) व शेतजमीन (2,32,354 हेक्‍टर) आहे. त्यापाठोपाठ ठाणे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नगर, पुणे, अमरावती, धुळे, नांदेड आदी जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. रायगड, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत अनुसूचित जमातींचे शेतजमीनधारक व धारण क्षेत्रात मोठी घट झालेली आहे.

चौकट
- अनुसूचित जातींची जमीनधारणा
घटक --- 1980-81 --- 2000-01 --- 2005-06 --- 2010-11
जमीनधारक --- 4,67,000 --- 9,45,000 --- 10,68,000 --- 10,29,000
वहिती क्षेत्र (हेक्‍टर) --- 9,57,000 --- 12,41,000 --- 12,34,000 --- 13,04,000
सरासरी जमीनधारणा (हेक्‍टर) --- 2.05 --- 1.31 --- 1.16 --- 1.27

चौकट
- अनुसूचित जमातींची जमीनधारणा
घटक --- 1980-81 --- 2000-01 --- 2005-06 --- 2010-11
जमीनधारक --- 4,14,000 --- 7,77,000 --- 8,79,000 --- 8,63,000
वहिती क्षेत्र (हेक्‍टर) --- 12,99,000 ---15,35,000 --- 1529,000 --- 15,62,000
सरासरी जमीनधारणा (हेक्‍टर) ---3.14 --- 1.98 --- 1.74 --- 1.81

(सर्व आकडेवारी स्रोत - कृषी गणना 2010-11)
------------ 

No comments:

Post a Comment