Wednesday, May 27, 2015

कृषी संशोधन प्रसाराची गती वाढवा

राज्यभरातील शेतकऱ्यांची अपेक्षा

- सेवा केंद्रांची गरज
कृषी विद्यापीठांचे तंत्रज्ञान, वाण व इतर संशोधन शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्येक तालुक्यात किमान एक सेवा केंद्र सुरु करावे. या ठिकाणी चारही कृषी विद्यापीठाची उत्पादने, माहिती व तंत्रज्ञान मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात यावे. यासाठी सध्या कार्यरत असलेल्या कृषी तंत्रनिकेतन व महाविद्यालयांचे विद्यापीठांची अधिकृत कृषी सेवा केंद्रे म्हणून मुल्यवर्धन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अशी केंद्रे सुरु करण्याचा विचार केला होता, मात्र तो बारगळला अशी माहिती काही संशोधकांनी दिली.

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील संशोधन दर वर्षी जाहीर केले जाते. मात्र ते तत्काळ शेतावर उपलब्ध होत नाही. वाणांची चौकशी केली, तर बियाणे उपलब्ध नसते. कृषी विभागाच्या लोकांनाही याची फार काही माहिती नसते. विद्यापीठांनी संशोधन जाहिर करण्यावर न थांबता ते बांधावर पोचविण्याची गती वाढविण्याचीही काळजी घ्यावी, अशी अपेक्षा राज्यभरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची वार्षिक बैठक गुरुवारपासून (ता.२८) राहूरी येथे सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विद्यापीठांचे संशोधन महत्वाचे असते मात्र ते उशीरा उपलब्ध होते, अशी खंत बहुतेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहेत. संशोधनाची माहिती मिळते मात्र नवीन वाणांचे बियाणे मिळत नाही, सुधारीत यंत्रे उपलब्ध नसतात ही अनेक शेतकऱ्यांची समान तक्रार आहे.

बेलगाव तऱ्हाळे (इगतपुरी,नाशिक) येथिल शेतकरी हिरामण आव्हाड म्हणाले, राहुरी विद्यापीठाची मार्गदर्शिका मी रेफर करतो. ॲग्रोवन मधूनही विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळते. नवीन बियाणे, औजारे, तंत्रज्ञान यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. पण ते भेटत नाही. संशोधन आमच्या हाती जेवढ्या लवकर येईल तेवढा फायदा जास्त होईल. यामुळे विद्यापीठांचे तंत्रज्ञान लवकरात लवकर उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप्लिकेशन सुरु करावे.

सावनेर (अमरावती) येथिल शेळीपालक अमोल भडके म्हणाले, सध्या तंत्रज्ञान, माहिती व सेवांसाठी आम्ही पूर्णपणे खासगी संस्थांवर अवलंबून आहोत. विद्यापीठाकडून माहीती व तंत्रज्ञान वेळेत उपलब्ध व्हायला हवे. विशेषतः शेळ्यांची रोगप्रतिकारता वाढवणे व लसींबाबतच्या संशोधनाची अपेक्षा आहे.

हडोळती (लातूर) येथिल शेतकरी मोहन यादव म्हणाले, निसर्ग शेतीसाठी साथ देईना झालाय. यंदा पावसाने पिके हातची घालवली. आता करायचं काय. सोयाबीन, हरभरा पिक येतंय पण हाती काहीही पैसा येत नाही. यावर फायदेशीर ठरेल असे कोणतेच संशोधन विद्यापीठांकडून उपलब्ध झालेले नाही. परिस्थितीवर मात करता येईल असे संशोधन, तंत्रज्ञान विद्यापीठांनी द्यावे.

- अशी होते संशोधन बैठक
राज्यातील कृषी विद्यापीठांनी विविध विभाग व संशोधन केंद्रांमार्फत वर्षभरात सिद्धीस नेलेले संशोधन, शिफारशी या बैठकीत सादर केल्या जातात. याबाबत तज्ज्ञांमार्फत प्रश्न, आक्षेप, सुधारणा मांडल्या जातात. या सर्वातून तावून सुलाखून निघालेल्या संशोधनाला समितीमार्फत राज्यात अवलंब करण्यासाठी मान्यता दिली जाते. या मान्यतेनंतरच हे संशोधन शेतकऱ्यांना वापरासाठी खुले होते. शिफारशी लगेच अमलात आणण्याच्या दृष्टीने प्रसारित केल्या जातात. तंत्रज्ञान प्रसाराची कार्यवाही कृषी विभाग व इतर संबंधीत विभागांमार्फत केली जाते. या अनुषंगाने संबंधीत सर्व विभागांच्या प्रतिनिधींचीही या बैठकीस उपस्थिती असते. नाकारण्यात आलेले किंवा आणखी सुधारणा सुचविण्यात आलेले संशोधन वा निष्कर्ष पुन्हा संशोधनाच्या प्रक्रीयेत जातात. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी, फिडबॅक आणि विद्यापीठांच्या संशोधनाची दिशा या दृष्टीनेही ही बैठक महत्वपूर्ण असते.
-------------(समाप्त)------------

No comments:

Post a Comment