Saturday, May 2, 2015

विदर्भात सर्वाधिक उष्मा

कमाल तापमान 45 अंशांवर; वर्धा, चंद्रपूर उच्चांकी

पुणे (प्रतिनिधी) ः कमाल तापमानाच्या उचावत्या पाऱ्याने विदर्भात अनेक ठिकाणी 44 ते 45 अंशांचा टप्पा गाठला आहे. यामुळे सध्या विदर्भ देशात सर्वाधिक उष्ण भाग आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासातही चंद्रपूरमध्ये देशातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पाठोपाठ वर्ध्यात पारा 44.5 अंशावर झेपावलेला होता. मराठवाड्यातही सर्वत्र कमाल तापमान 41 ते 43 अंशांदरम्यान आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्‍यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी (ता.3) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. सोमवारी (ता.4) फक्त विदर्भात तर मंगळवारी (ता.5) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी (ता.6) फक्त विदर्भात पावसाची चिन्हे असून उर्वरीत महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

जम्मू काश्‍मिर व लगतच्या भागात पश्‍चिमी चक्रावात कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरुपात सक्रीय आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात चक्राकार वारे सक्रीय असून त्यांच्यापासून छत्तीसगड ते तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. पूर्व उत्तरप्रदेशपासून आसामपर्यंतच्या भागातही एक कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. मध्य प्रदेशच्या उत्तर भागात आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रातही चक्राकार वारे सक्रीय आहेत.

शनिवारी (ता.2) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 34.7, अलिबाग 34.5, रत्नागिरी 33.6, पणजी 34.5, डहाणू 34.8, पुणे 37.4, जळगाव 43, कोल्हापूर 37.5, महाबळेश्‍वर 30.8, मालेगाव 43.8, नाशिक 38.4, सांगली 39, सातारा 38.9, सोलापूर 42.6, उस्मानाबाद 41.2, औरंगाबाद 41.3, परभणी 42.6, अकोला 42.7, अमरावती 42.8, बुलडाणा 40.3, ब्रम्हपुरी 43.7, चंद्रपूर 45, नागपूर 44.3, वाशिम 41.2, वर्धा 44.5, यवतमाळ 42.5
--------- 

No comments:

Post a Comment