Wednesday, May 13, 2015

शेळ्या-मेंढ्यांवर "पीपीआर'चा कहर

विषाणूचा प्रादुर्भाव वाढला; अनेक कळपांत 50 टक्‍क्‍यांपर्यंत मर

*कोट
""पीपीआर रोगामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यांची मर झाली आहे. राज्यातील सर्व शेळ्या मेंढ्यांसाठी 67 लाख लसींची गरज आहे. केंद्राकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला असून पाठपुरावा सुरु आहे.''
- डॉ. कुंभार, पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र राज्य.

पुणे (प्रतिनिधी) : गेली काही वर्षे बऱ्यापैकी नियंत्रणात असलेल्या पेस्टिस दी पेटिट्‌स रुमिनन्ट (पीपीआर) या विषाणूजन्य रोगाने अचानक उचल खाल्ल्याने गेल्या सहा महिन्यात राज्यात मोठ्या संख्येने शेळ्या-मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. अनेक जिल्ह्यांतील शेळी मेंढीपालकांना कळपच्या कळप निम्म्याने घटून मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे पशुसंवर्धन विभागामार्फत शासकीय योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या कळपातील निम्म्यापर्यंत शेळ्या मेंढ्या मेल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

पशुसंवर्धन विभागामार्फत पीपीआर रोगाच्या नियंत्रणासाठी दर वर्षी एप्रील महिन्यात लसीकरण केले जाते. ही लस टोचल्यावर तीन वर्षे शेळी-मेंढीला रोगाची लागण होण्याचा धोका नसतो. मात्र लसींच्या मर्यादीत उपलब्धतेमुळे पशुसंवर्धन विभागामार्फत सध्या फक्त नवजात करडांनाच ही लस टोचण्यात येत आहे. मोठ्या शेळ्या मेंढ्यांना ही लस टोचली जात नाही. शेळ्या मेंढ्यांचे स्थलांतरण व लसीकरणाचा अभाव आणि वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेले विषाणू पोषक हवामान यामुळे हा रोग बळावल्याचे चित्र आहे.

गेल्या महिनाभरात राज्यभरात 40 लाख शेळ्या मेंढ्यांना विशेषतः करडे व कोररांना ही लस देण्यात आली आहे. मात्र यानंतरही पीपीआरचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणारी मर कायम आहे. पशुसंवर्धन विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये 50 टक्के अनुदानावर शेळ्या व मेंढ्यांचा पुरवठा केला आहे. अनुसुचित जाती व जमातीतील पशुपालकांनी 50 टक्के पशुपालक हिस्सा भरुन शेळ्या मेंढ्यांची खरेदी केली आहे. त्यातील अनेक कळपांमध्ये (40 मादी, 2 नर) तब्बल 15 ते 20 शेळ्या मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. यामुळे हे पशुपालक आर्थिक संकटात सापडले असून व्यवसाय सुरु होताच बंद पडण्याचा धोका उद्भवला आहे.

* चौकट
- असा आहे पीपीआर रोग
पेस्टिस दी पेटिट्‌स रुमिनन्ट (पीपीआर) हा शेळ्या व मेंढ्यांच्या पचनसंस्था व श्‍वसनसंस्थेशी संबंधीत विषाणूजन्य रोग आहे. रोगाची लागण झाल्यावर फुफुसदाह होतो. नाकातून मोठ्या प्रमाणात स्त्राव (शेंबुड) वाहू लागतो. पातळ व दिर्घकाळ हगवण होते. अंगात ताप वाढतो. अशक्तपणा येतो. डोळे लाल झालेले दिसतात. रोगप्रतिकारक्षमता कमी होते. विष्ठा व नाकातील स्त्रावाद्वारे इतर जनावरांमध्येही रोगाचा प्रसार होतो. प्रादुर्भाव झालेल्या 25 ते 30 टक्के जणावरांचा गर्भपात होतो. मरतूकीचे प्रमाण 20 ते 25 टक्के आढळते. चार पाच वेळा झालेली गारपीट व तापमानातील चढ उतार यामुळे यंदा विषाणूंचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तशात आर्थिक असमर्थता, प्रतिकुल परिस्थिती व जनावरांवर वाढलेला ताण यामुळे उपचार केले जात नाहीत. लक्षणे दिसल्याबरोबर उपचार केल्यास जनावर वाचू शकते, अशी माहिती जेष्ठ पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नितिन मार्कंडेय यांनी दिली.

* चौकट
- राज्यव्यापी अभियानाची गरज
पीपीआर रोगाच्या नियंत्रणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलियो लसीकरणाच्या धर्तीवर शेळ्या मेंढ्यांसाठी पीपीआर लसीकरण मोहीम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. विष्ठा व स्त्रावातून या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने व राज्यात शेळ्या मेंढ्यांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणात असल्याने रोग नियंत्रणासाठी ही मागणी करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने यासाठीच्या लसींची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. मात्र अद्याप त्यास अंतीम मंजूरी मिळालेली नाही. या रोगाचा प्रादुर्भाव असल्यास पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या 1800 2330 418 या मोफत (टोल फ्री) दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन अथवा वैद्यकीय मदत मिळवावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
------------ 

No comments:

Post a Comment