Tuesday, May 5, 2015

Yashogatha - कोल्हारवाडी - तुकाराम, सोपान व विलास एरंडे

एकत्र  कुटुंबाचे बळ
शेतीमध्ये मिळते फळ
--------------
शेतीत समस्या अनेक आहेत हे खरे. मात्र कुटुंब एकत्र असेल तर या समस्यांवर सहज मात करुन शेतीत चांगले यश मिळवता येते, हे कोल्हारवाडी (ता.आंबेगाव, पुणे) येथिल तुकाराम, सोपान व विलास ज्ञानेश्‍वर एरंडे या तिघा बंधूंनी दाखवून दिले आहे. एरंडे बंधूंनी कौटुंबिक एकीच्या बळावर सिंचन, मजुरी, निविष्ठा, यंत्रे, तंत्रज्ञान, मार्केट, पुरक व्यवसाय आदी सर्व समस्यांचे रुपांतर बलस्थानात केले आहे.
---------------
संतोष डुकरे
---------------
सातगाव पठार हा आंबेगाव तालुक्‍याचा कोरडवाहू भाग बटाटा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील कोल्हारवाडीत एरंडे कुटुंबियांची पारंपरिक 35 एकर कोरडवाहू शेती आहे. सर्व शेती एकाच जागेवर आणि भोवताली सह्याद्रीची उभी-आडवी डोंगररांग यामुळे येथिल हवामानही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पावसाळ्यात जेमतेम पाऊस पडतो. तो खरिपात बटाटा उत्पादन घेण्यासाठी पुरेसा ठरतो. सप्टेंबरपासून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. यामुळे खरिपात सर्व 35 क्षेत्रावर बटाटा आणि त्यानंतर विहीरींच्या भरवश्‍यावर पाच सहा एकरावर रब्बी असे एरंडे कुटुंबाच्या शेतीचे अगदी अलिकडे 2013 पर्यंतचे स्वरुप होते. सुमारे 20 जणांचे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब तशाही स्थितीत अतिशय काटेकोरपणे शेतीत यश मिळवून होते. मात्र यानंतर शेततळ्याने त्यांच्या शेतीचा चेहरा मोहराच बदलून टाकला.

- स्वश्रमाने 8 दिवसात शेततळे
एरंडे कुटुंबियांनी 2013 साली शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला. पावसाळा तोंडावर आलेला. वर्ष वाया जावू द्यायचे नव्हते. शेवटी घरातील सर्वजण घरच्या यंत्रसामग्रीसह कामाला लागले आणि अवघ्या 8 दिवसात 44 मीटर लांब, 48 मीटर रुंद व 6 मिटरहून अधिक खोलीचे शेततळे उभारले. कृषी विभाग व प्लॅस्टिक कागद कंपनीला आठ दिवसात शेततळे झाले हे खरे वाटेना. त्यांनी प्रत्यक्ष मोजमापे घेवून खात्री केल्यानंतर पुढच्या आठ दिवसात कागद बसला. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून 5 लाख 56 हजार रुपये अनुदान मिळाले.

- सिंचन क्षेत्रात दुपटीने वाढ
शेततळे होण्याआधी एरंडे कुटुंबियांची सर्व शेती फक्त पावसावर अवलंबून होती. दोन-तीन विहीरी आहेत, मात्र त्यांचा आसरा अवघ्या चार पाच एकर क्षेत्राला व जेमतेम जानेवारीपर्यंत. शेततळे झाले आणि संरक्षित पाण्याच्या हमीमुळे सिंचन क्षेत्रात दुपटीने वाढ झाली. पावसाळ्यात विहीरी भरल्या की हे पाणी उपसून शेततळे भरले जाते. यातून सायफन पद्धतीने सर्व शेतात पाणी पुरवले जाते. संरक्षित पाण्यामुळे रब्बीचे क्षेत्र पाच एकरावरुन 35 एकरापर्यंत आणि उन्हाळीचे सहा एकरापर्यंत वाढले.

- पिकपद्धतीत संरक्षित बदल
खरिपात कोणताही बदल न करता सर्व क्षेत्रावर बटाटा उत्पादनाचा पायंडा त्यांनी कायम ठेवला. यंदा त्यांनी पावसावर 32 एकर क्षेत्रात दोन हजार पिशवी बटाटा उत्पादन घेतले. रब्बी हंगामात 32 एकरवर कांदा, बटाटा, ज्वारी तर उन्हाळीत सहा एकर क्षेत्रावर कोबी, फ्लॉवर, बीट, उन्हाळी बाजरी, उन्हाळी भुईमुग, काबुली हरभरा, मेथी अशी पिके घेतात. त्यांची रब्बी व उन्हाळी या दोन्ही हंगामाची पिकपद्धती बदलून नगदी झाली आहे. संरक्षित पाण्याच्या बळावर नगदी पिके यशस्वी ठरल्याने शेतीच्या नफ्यातही वाढ झाली आहे.

- सर्व कामे घरच्या घरी, स्पेशलायझेशनसह
तुकाराम (वय 55), सोपान (वय 52) व विलास (वय 50) हे तिघे भाऊ, त्यांच्या पत्नी, आई शेवंताबाई, मुले, मुली, सुन असे 20 जणांचे हे एकत्र कुटुंब आहे. सहा मुले-मुली शिक्षण घेत आहेत. बटाटा व कांदे काढणीचा अपवाद वगळता सर्व कामे घरच्या घरीच करतात. दोन ट्रॅक्‍टर (55 व 22 एचपी) व सर्व प्रकारचे आधुनिक शेती अवजारे आहेत. सर्व मुले व मुली ती चालवण्यात निष्णात आहेत. घरातील प्रत्येक माणसाचे वेगवेगळ्या कामांमध्ये स्पेशलायझेशन आहे. सोपानराव बाहेरील व्यवहार सांभाळतात. विलासराव हे पेरणीत तज्ज्ञ आहेत. गेली दोन दशके ते कुटुंबाच्या सर्व तुकारामरावांच्या देखरेखीखाली सर्व कामे सुरु असतात. विलासराव पेरणीच्या कामांत तर कुटुंबातील जेष्ठ मुलगा तुषार हा जेसीबी पासून छोट्या ट्रॅक्‍टरपर्यंत सर्व यंत्रे, अवजारे चालविण्यात मास्टर आहे.

- उन्हाळी बाजरीत मास्टरी
बटाटा, कांदा उत्पादन आणि कांदा व इतर पिकांच्या रोपनिर्मितीबरोबरच गेल्या काही वर्षात एरंडे कुटुंबियांनी उन्हाळी बाजरी उत्पादनात मास्टरी मिळवली आहे. पुर्वी अर्ध्या एकरावर असलेले बाजरीचे क्षेत्र आता त्यांनी चार एकरापर्यंत वाढवले आहे. गेल्या वर्षी चार एकरात त्यांनी 60 पोती उत्पादन मिळवले. यंदा बटाट्याच्या बेवडावर महाशिवरात्रीनंतर चार दिवसांनी एक एकरावर उन्हाळी बाजरी पेरली आहे. तीची दाणे भरण्याच्या अवस्था 90 टक्के पूर्ण झाली आहे. येत्या आठ पंधरा दिवसात बाजरी काढणीस येईल. एकरात 20 क्विंटल उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे.

- दुग्धव्यवसाय
कुटुंबाची दुधाची दैनंदिन गरज आणि आथिक उत्पन्नाचाही मार्ग म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. सध्या त्यांच्याकडे तीन एच एफ गाई आहेत. दररोज सरासरी घरच्या उपयोगासाठी 10 लिटर व उर्वरीत 25 लिटर दुध डेअरीला जाते. गवत, मका, ज्वारी, बाजरी यांचा चारा म्हणून उपयोग होतो. कुटुंबाचा पुर्वी बैलगाडा होता. सात बैल होते. शर्यतींवर बंदी आल्यावर सहा बैल विकले. शेतकऱ्याच्या दावणीला एकही बैल नाही, हे बरोबर वाटत नाही म्हणून एक बैल ठेवलाय. शेतीची कामे सर्व ट्रॅक्‍टरनेच केली जातात.

- मत्स्यपालन
दीड वर्षापूर्वी शेततळ्यामध्ये 24 हजार मत्स्यबीज सोडून एरंडे कुटुंबियांनी मत्स्योत्पादन व्यवसायही सुरु केला आहे. पोपट व कटला या दोन जातीच्या माशांचे ते उत्पादन करतात. मत्सबीज खरेदी व मासे विक्री या दोन्हींसाठीची सोय खेड येथिल एक मत्स्यविक्रेत्यामार्फत होते. गेल्या महिन्यात त्यातील एक टन माशांची 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. सरासरी दोन ते चार किलो वजनाचे मासे आहेत. मत्स्यखाद्य म्हणून ज्वारी, बाजरीचा भरडा, शेण यांचा वापर केला जातो.

- कुक्‍कुटपालन
एरंडे कुटुंबिय 2000 सालीपासून कुक्कुटपालन करत आहे. यासाठी 150 फुट लांबीची दोन शेड व 200 फुट लांबीचे एक शेड उभारले आहे. त्यात अनुक्रमे नऊ हजार व सहा हजार पक्षी बसतात. पहिली 12 वर्षे त्यांनी एका खासगी कंपनीशी करार पद्धतीने व्यवसाय केला. मात्र यानंतर करार बंद करुन बटाटा साठवणूकीसाठी शेडचा वापर सुरु केला. फक्त उन्हाळ्यात कुक्कुटपालन केले जाते. या कालावधीतही कंपनीसाठी वर्षभर कुक्कुटपालन करण्यापेक्षा अधिक नफा होतो, असा त्यांचा अनुभव आहे. पक्षांची विक्री मध्यस्तामार्फत मुंबई व पुण्यात करतात. यातून वर्षाकाठी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

- नियोजन, व्यवस्थापन काटेकोर
खरिपात सर्व बटाटा, रब्बीत कांदा, बटाटा, ज्वारी आणि उन्हाळ्यात भाजीपाला हे सुत्र आहे. पुढील वर्षभरात कोणती पिके घ्यायची, त्या अनुषंगाने जमीनीचा बेवोड तयार करणे, खते, बियाणे व रोपांचे नियोजन वर्षभर आधीच तयार असते. प्रत्येक गोष्टीची वेळच्या वेळी अंमलबजावणी केली जाते. कोणत्याही पिकाचे रोप विकत घेत नाहीत. सर्व बियाणे व रोपे शेतातच तयार करतात. कांदे बिजोत्पादनातही हे कुटुंब अग्रसर असून इतरत्र बियाण्याचा तुटवडा असतानाही तीन-चार पोती बियाणे शिलकीत असते. आले पिकापाठोपाठ हळूहळू सर्व शेतीसाठी सुक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे त्यांचे नियोजन आहे. चार एकरवर मल्चिंगवर टोमॅटो लागवडीची लगबग सध्या सुरु आहे.
------------
संपर्क ः सोपान एरंडे 9822408727, तुषार एरंडे 9921751475
------------ 

No comments:

Post a Comment