Tuesday, May 12, 2015

कृषी गणना विशेष - भाग 6

शेतीसाठी "जत' सर्वांत मोठा तालुका

कऱ्हाडमध्ये सर्वाधिक शेतकरी; ठाण्यात सर्वांत कमी जमीनधारणा

संतोष डुकरे
पुणे ः राज्यातील शेतजमीनधारणेचे तालुकानिहाय विश्‍लेषण करता सांगली जिल्ह्यातील जत तालुका राज्यातील सर्वांत मोठा (1,92,387.82 हेक्‍टर) तालुका ठरला आहे. राज्यात सर्वाधिक जमीनधारक सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात (1,31,074) आहे. सर्वाधिक सरासरी जमीनधारणा ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्‍यात (4.23 हेक्‍टर), तर सर्वांत कमी ठाणे तालुक्‍यात 0.47 हेक्‍टर एवढी आहे. दोन हेक्‍टरहून अधिक जमिनधारणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण विदर्भात अधिक आहे.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुका हा 84 हजार 850 हेक्‍टर शेतजमिनीसह शेतीच्या दृष्टीने सर्वांत मोठा तालुका आहे. चिपळूण तालुक्‍यात सर्वाधिक 75 हजार 81 जमीनधारक असून, अल्प व अत्यल्पभूधारकांची सर्वाधिक संख्याही चिपळुणातच आहे. सरासरी जमीनधारणाक ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्‍यात सर्वाधिक 4.23 हेक्‍टर, तर सर्वांत कमी ठाणे तालुक्‍यात 0.47 हेक्‍टर एवढी आहे.

मध्य महाराष्ट्रात शेती क्षेत्राच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील जत तालुका (1,92,387.82 हेक्‍टर) सर्वांत मोठा असून, जमीनधारकांची सर्वाधिक संख्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्‍यात (1,31,074) आहे. याच तालुक्‍यांत अत्यल्पभूधारकांची संख्या (1,11,385) सर्वाधिक आहे. अल्पभूधारकांची सर्वाधिक संख्या नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्‍यात (32,160) आहे. सरासरी जमीनधारणेत पुणे शहर (2.65 हेक्‍टर) अग्रभागी आहे. मात्र, या तालुक्‍यात फक्त 86 शेतकरी व 227.51 हेक्‍टर जमीन आहे. यापाठोपाठ दक्षिण सोलापूर या तालुक्‍यातील जमीनधारकांची सरासरी जमीनधारणा 2.59 हेक्‍टर आहे. या तालुक्‍याचे क्षेत्र एक लाखाहून अधिक व जमीनधारक संख्या 38 हजाराहून अधिक आहे.

मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुका (1,36,456.92 हेक्‍टर) शेतीच्या दृष्टीने सर्वांत मोठा आहे. याच तालुक्‍यात विभागात सर्वाधिक 2.25 हेक्‍टर सरासरी जमीनधारना आहे, तर औरंगाबादमधील कन्नड तालुक्‍याची सरासरी जमीनधारणा सर्वांत कमी (1.10 हेक्‍टर) आहे. जमीनधारकांच्या संख्येत बीडमधील गेवराई तालुका (96,283) आघाडीवर आहे. अत्यल्पभूधारकांची सर्वाधिक संख्या (51,265) बीड तालुक्‍यात, तर अल्पभूधारकांची सर्वाधिक संख्या (35,087) वैजापूर तालुक्‍यात आहे.

विदर्भात अकोला तालुक्‍यात सर्वाधिक 92 हजार 167.39 हेक्‍टर शेतजमीन असून, सर्वाधिक जमीनधारक गोंदिया तालुक्‍यात (53,441) आहेत. सरासरी जमीनधारणा यवतमाळमधील केळापूर तालुक्‍यात सर्वाधिक 2.75 हेक्‍टर, तर सर्वांत कमी गोंदिया तालुक्‍यात 0.80 हेक्‍टर आहे. सर्वाधिक अल्पभूधारक अकोला तालुक्‍यात (19,344) आहेत, तर अत्यल्पभूधारकांची सर्वाधिक संख्या गोंदिया तालुक्‍यात 40 हजार पाच एवढी आहे. पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यातीलच तिरोडा तालुक्‍यात 28 हजार अत्यल्पभूधारक आहेत. अत्यल्पभूधारकांची संख्या विदर्भात कमी असल्याचे चित्र आहे. 

No comments:

Post a Comment