Thursday, May 14, 2015

जावे पुस्तकांच्या गावा - भू-मेह

पुस्तकाचे नाव : भू-मेह
लेखक :  प्रणय श्रावण पराते (9823190174)
प्रकाशक :  निर्मिती प्रकाशन, नागपूर
पृष्ठे :  150
मुल्य :  200 रुपये
-------------------
अति गोड सेवनाने मधुमेह होतो. तसा शेती विकून अचानक हाती आलेल्या अतिपैशानं भू-मेह होतो अशी सिद्धांतीक मांडणी लेखकाने यात केली आहे. हा भु मेह कसा होतो आणि त्याचे विकृत परिणाम काय काय असू शकतात हे या पुस्तकात अगदी पोलिस स्टेशनात दाखल झालेल्या गुन्ह्यांचे पुरावे देवून लेखकाने स्पष्ट केले आहे. शेती करणे जिकीरीचे झालेल्या सध्याच्या काळात शहरांलगच्या शेतकऱयांना शेती विकून कोट्यवधी रुपये कमविण्याची संधी उपलब्ध झाली. या लाटेत जे सापडले त्यातील बहुतेकांची वाताहात झाल्याचे, घरची तरुण मुलं एकदम पैसा पाहून असंस्कृत होत असल्याचे आणि एकूणच शेती संस्कृती, शेतकरी आणि कुटुंब उध्वस्त होत असल्याचे चित्रण प्रणय पराते यांनी या पुस्तकात केले आहे. हे चित्रण करण्यासाठी त्यांनी गावोगाव फिरुन माहीती गोठा करुन त्यातील निष्कर्षांशी प्रमाणिक राहत वस्तूस्थिती मांडली आहे. एखादा संशोधन प्रबंधासारखे परंतु वेगळ्याच संवादी शैलीत या पुस्तकाची मांडली लेखकाने केली आहे. जमीनीतील घट, दुध उत्पादन व उत्पादकांतील घट, शेतजमिनीची विक्री, देशी-विदेशी दारु विक्री, वाढलेली गुन्हेगारी यांची माहिती अधिकारात माहिती मिळवून भू मेहाचे परिणाम दुष्काळाच्या परिणामांपेक्षाही भयाणक असू शकतात हे लेखकानं सप्रमाण दाखवून दिले आहे. हे पुस्तक नागपूरभोवती फिरत असले तरी त्यातील प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातील लहानमोठ्या शहरांभोवती सुरु असलेल्या भू अर्थकारणाला लागू होते.

शहरांजवळील शेतजमीनी संपूष्टात येत आहेत. कृषीजमीनींचे अकृषकीकरण धूमधडाक्यात सुरु आहे. जमीनीच्या दरापोटी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. नागपूर शहर व परिसरातील कृषी जमीनीवर पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेती, शेतकरी आणि ग्रामीण संस्कृतीच्या अवनतीचे चित्रण केले आहे. विकास आणि शहरीकरणाच्या नावाखाली शेतसंपत्तीचे, शोषणाचे विदारक वास्तव पुढे आले आहे. कृषी विद्याशाखेचे पदव्युत्तर पदवीधर असलेले प्रणय पराते नागपूर परिसरातील गावोगाव फिरून आपले निरिक्षण आणि नोंदीतून हा अभ्यासपूर्ण लेखाजोखा मांडला आहे. प्रा. शरद पाटील यांनी प्रस्तावणेत सांगितल्याप्रमाणे या पुस्तकात मांडलेले प्रश्न व माहिती ही नेहमीप्रमाणे शेतीवरील अस्मानी व सुलतानी आपत्तींशी संबंधित नाहि. तर शेतकऱ्यांकडे शेतीच्या विक्रीतून अचानक मोठ्या प्रमाणात पैसा आला तर त्याची कशी दुरावस्था होते हा या लिखाणाचा आत्तापर्यंत दुर्लक्षित पण तरीही अत्यंत ज्वलंत असा विषय आहे. पिकाखालील सुपिक जमीनीतील घट, खरेदी विक्रीमधील फसवणूक, वाढती गुन्हेगारी, शहरांती अनियंत्रित व दिशाहिन वाढ, नागरी सुविधांवरील ताण व या सर्वाचा परिसरातील शेती, शेतकरी व कुटुंब व्यवस्थेवर होणारा परिणाम यांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. एकीकडे शेतीत कसून विकास करु पाहणारांची वाताहात सुरु असताना दुसरीकडे शेती विकून विकास करु पाहणारांची त्याहूनही अधिक भिषण वाताहात होत असल्याचे लेखकाने यात सिद्ध केले आहे. आर्थिक साक्षरता व पैशाचे व्यवस्थापन शेतकऱयांसाठी किती महत्वाचे आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम कसे वाईट अशू शकतात याकडे हे पुस्तक कटाक्षाने लक्ष वेधते.

No comments:

Post a Comment