Wednesday, May 20, 2015

मॉन्सून अंदमान व्यापून पुढे सरकणार

विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट; खानदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या पाच दिवसांपासून अंदमानात मुक्काम ठोकलेला मॉन्सून शुक्रवारपर्यंत (ता.22) अंदमानचा उर्वरीत भाग व्यापासून बंगालच्या उपसागरात आगेकुच करण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि केरळात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान निकोबारमध्ये बहुतेक ठिकाणी तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. येत्या शनिवारपासून (ता.23) कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

राज्यात विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही उष्णतेची लाट दाखल झाली असून कमाल तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील दोन दिवस विदर्भ व मराठवाड्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रातही (विशेषतः खानदेश) उष्णतेची लाट राहण्याचा इशारा हवामान खात्यामार्फत देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात या भागातील कमाल तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात कमाल तापमानाचा पारा तब्बल 48 अंशांच्या जवळपास पोचला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात वर्धा येथे देशातील सर्वाधिक 47.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ होते.

दरम्यान, उपसागराच्या उत्तर पूर्व भागातील चक्राकार वारे कायम आहेत. पूर्व बिहार व लगतच्या भागावरील चक्राकार वारे आणि त्यापासून ओदिशापर्यंतचा कमी दाबाचा पट्टाही कायम आहे. पश्‍चिम राजस्थानपासून उत्तर प्रदेश, झारखंड ते उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता कमी झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणातही उष्णतेची लाट आहे. उपसागरातील चक्राकार वारे आणि मध्य भारतातील उष्णतेची लाट यामुळे मॉन्सूनच्या वाटचालीस आणखी बळ मिळण्याची शक्‍यता आहे.

बुधवारी (ता.20) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान व कंसात सरासरीच्या तुलनेतील वाढ किंवा घट अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 35.2 (2), भिरा 38 (0), डहाणू 36 (2), हर्णे 34 (3), मुंबई 36 (2), रत्नागिरी 34 (1), जळगाव 43.2 (0), कोल्हापूर 33.7 (-1), महाबळेश्‍वर 29.4 (-1), मालेगाव 44.8 (5), नाशिक 37.7 (0), पुणे 36.2 (-1), सांगली 35.3 (-2), सातारा 37.1 (2), सोलापूर 43.7 (4), औरंगाबाद 43.8 (5), उस्मानाबाद 43, परभणी 45.5 (3), नांदेड 43.2, अकोला 46.4 (4), अमरावती 45.6 (4), ब्रम्हपुरी 45.8 (4), बुलडाणा 42 (4), चंद्रपूर 46.8 (4), नागपूर 46.9 (4), वर्धा 47.5 (4), यवतमाळ 45.6 (4)
-------------- 

No comments:

Post a Comment