Wednesday, May 6, 2015

कृषी गणना विशेष - भाग 3

वहिती शेतजमीनीत दरवर्षी
56 हजार हेक्‍टरची गळती

एन.ए. च्या प्रमाणात भरिव वाढ; सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर

संतोष डुकरे
पुणे ः राज्यात दर वर्षी सरासरी 56 हजार हेक्‍टर शेतजमीनीचे बिगरशेतजमीनीत (एन.ए) रुपांतर होत असल्याची धक्कादायक बाब कृषी गणनेतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे शेतजमीनीतील ही घट सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, औरंगाबाद, जालना, नागपूर, ठाणे या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. गेल्या दहा वर्षात 18 जिल्ह्यात कमी झालेल्या सुमारे 6.75 लाख हेक्‍टर शेतजमीनीपैकी एकट्या सातारा जिल्ह्यात 1.28 लाख हेक्‍टर शेतजमीन एन. ए. झाली आहे.

मुंबई शहर व उपनगर वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 33 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये 2011 पर्यंतच्या दहा वर्षात वहीतीखालील शेतजमीनीचे बिगरशेत जमीनीत रुपांतर झाले आहे. याशिवाय 15 जिल्ह्यांमध्ये वहिती शेतजमीनीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. चंद्रपूर, नंदुरबार, गडचिरोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, रायगड या जिल्ह्यांमधील शेतजमीनीत गेल्या कृषी गणनेच्या तुलनेत चार ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. धुळे, लातूर, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये वहितीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या चारही विभागात मोठ्या शहरांच्या आसपास शेतीचे बिगरशेतीत रुपांतर होण्याचे प्रमाणात जास्त आहे. कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी, पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना तर विदर्भात नागपूर, यवतमाळ, बुलडाणा भागात शेतीचे क्षेत्र कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. यात प्रकल्पांसाठीचे आरक्षण, संपादन आदी बाबींसाठी शेतीतून वजा झालेल्या क्षेत्राचाही समावेश आहे.

राज्यात दहा वर्षाच्या कालखंडात 18 जिल्ह्यात वहिती क्षेत्रात झालेली घट व 15 जिल्ह्यात झालेली वाढ यांची एकूण वहितीखालील क्षेत्राशी तुलना करता दहा वर्षात एकूण वहितीखालील तीन लाख 35 हजार हेक्‍टर क्षेत्रात घट झाली आहे. 2000-01 साली हे क्षेत्र 2.01 कोटी हेक्‍टर होते. ते आता 1.97 कोटी हेक्‍टर झाले आहे.

*चौकट
- जिल्हानिहाय शेतजमीन घट (2000-01 ते 2010-11)
जिल्हा --- क्षेत्रातील घट (हेक्‍टर) --- घटीचे प्रमाण (- टक्के)
सातारा --- 1,28,284 --- 16.56
सिंधुदुर्ग --- 94,431 --- 25.28
रत्नागिरी --- 92,734 --- 14.17
नगर --- 78,904 --- 5.90
औरंगाबाद --- 37,554 --- 5.15
नागपूर --- 35,155 --- 6.46
जालना --- 34,406 --- 5.49
पुणे --- 30,712 --- 2.95
सांगली --- 30,485 --- 4.32
ठाणे --- 27,383 --- 6.56
कोल्हापूर --- 25,157 --- 5.21
यवतमाळ --- 15,109 --- 1.81
बुलडाणा --- 14,930 --- 2.10
हिंगोली --- 10,574 --- 2.86
वाशिम --- 6,772 --- 1.78
जळगाव --- 4,692 --- 0.60
नाशिक --- 4,399 --- 0.45
बीड --- 3,128 --- 0.36
(स्त्रोत ः कृषी गणना 2010-11)
------------------------------ 

No comments:

Post a Comment