Sunday, May 18, 2014

5 जूनला माॅन्सून केरळात

बाष्पयुक्त ढगांची दाटी; मुसळधार पावसाचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) ः अंदमान व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागाला नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे वेध लागले आहेत. पुढील 24 तासात म्हणजेच शनिवारी (ता.17) दुपारी 12 वाजेपर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान व उपसागराच्या दक्षिण भागात पोचण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. अंदमान निकोबार बेटांवर सर्वदूर पावसाला सुरवात झाली असून शुक्रवारी या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी (ता.15) सकाळपर्यंतच्या चोविस तासात अंदमान व निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व अंदमान निकोबार बेटांवर बाष्पयुक्त ढगांच्या प्रमाणात आणखी वाढ झाली. उपसागराच्या दक्षिण भागात हवेच्या वरच्या थरातील चक्राकार वार्यांचा जोरही ओसरला. राजस्थान व लगतच्या भागावरील चक्राकार वारे शुक्रवारी ओसरण्याचा अंदाज आहे. दक्षिण छत्तीसगडपासून तामिळनाडूपर्यंतच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार छत्तीसगड ते तेलंगणापर्यंत कमी झाला आहे.

दरम्यान, बिहार, पश्‍चिम बंगाल, ओडिशा व आंध्र प्रदेशच्या किनारी भागात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली असून अनेक ठिकाणी कमाल तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. काही ठिकाणी ही लाट शुक्रवारीही कायम राहण्याची शक्‍यता आहे. रविवारपर्यंत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश व राजस्थानसह उत्तर भारतात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम व मेघालयात बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

आसाम व मेघालायात समुद्रसपाटीच्या पातळीहून 900 मिटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहे. या वार्यांच्या प्रभावाने या भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. आसाममधील हाफलॉंग येथे गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात देशातील सर्वाधिक 110 मिलीमिटर पाऊस झाला. याच वेळी उत्तर अंदमानापासून उपसागराच्या दक्षिण भागापर्यंत सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार समुद्रसपाटीच्या पातळीहून 3.1 किलोमिटर उंचीपर्यंत आणखी वाढला आहे.
---------------

No comments:

Post a Comment