Friday, May 9, 2014

कृषिकन्यांना शेती नकोशी!

पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशोधनातील निष्कर्ष

संतोष डुकरे
पुणे ः गेल्या एक-दीड दशकात कृषी शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढले असले तरी प्रत्यक्षात या मुलींना शेती नकोशी असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुणे कृषी महाविद्यालयातील एल. निकिता या विद्यार्थिनीने एमएस्सी ऍग्री अभ्यासक्रमाच्या संशोधन प्रबंधासाठी केलेल्या संशोधनातून पुढे आला आहे.

निकिताने "कृषी पदवीपूर्व विद्यार्थिनींच्या महत्त्वाकांक्षा' या विषयावर डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. यात पुणे, अकलूज व बारामती येथील कृषी महाविद्यालयांमध्ये पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातून आलेल्या 120 मुलींच्या महत्त्वाकांक्षांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी एका मुलीने कृषी व संलग्न क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा व्यक्त केली असून, उर्वरित 99 टक्के मुलींनी शेती व संलग्न क्षेत्रात उतरण्यास नापसंती दाखवली आहे.

राज्यात कृषी शिक्षणाची पाळेमुळे विस्तारून 100 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यात पहिली नऊ दशके प्रामुख्याने मुलांचीच मक्तेदारी राहिली. वर्गात मुली शोधाव्या लागत, इतपत त्यांची उपस्थिती असे. हे चित्र 1990 च्या दशकात हळूहळू बदलले. 2000 नंतर मुलींची संख्या अधिक वाढली. सध्या दर वर्षी सुमारे दोन ते अडीच हजार विद्यार्थिनी कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. मात्र यापैकी बहुतेक विद्यार्थिनी या शिक्षणाकडे एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचे साधन म्हणूनच पाहत असल्याचे चित्र या संशोधनाने अधोरेखित झाले आहे.

निकिताने केलेल्या संशोधनात्मक पाहणीत तब्बल 83 टक्के मुलींनी सरकारी नोकरी करण्याची मनीषा व्यक्त केली. अवघ्या सात टक्के मुलींनी स्वयंरोजगाराची व तीन टक्के मुलींनी खासगी क्षेत्रात काम करण्याची तयारी दर्शविली. यातही सर्वाधिक 68 टक्के पसंती एमपीएससीला, प्रत्येकी 13 टक्के कल यूपीएससी व बॅंकिंगकडे, तर अवघ्या दोन टक्के मुलींनी संशोधनात काम करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.

पुढील शिक्षणाच्या बाबतीत 83 टक्के मुलींनी कृषीमध्येच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याची मनीषा व्यक्त केली. सुमारे नऊ टक्के विद्यार्थिनींनी पीएच. डी., तर आठ टक्के विद्यार्थिनींनी व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याचा मनोदय व्यक्त केला. माहिती व मार्गदर्शनाचा अभाव ही कृषीच्या विद्यार्थिनींसमोरील सर्वांत मोठी अडचण असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय शिक्षण घेताना आर्थिक चणचण, दुर्गम भागातील वास्तव्य व कुटुंबाची पारंपरिक मानसिकता या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

*चौकट
कृषीतून बाहेर पडण्यासाठी कृषी शिक्षण?
सर्वसाधारणपणे ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या क्षेत्राचे वा व्यवसायाचे शिक्षण घ्यावे असा प्रघात आहे. शेतीच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती उलट असल्याची बाब आता संशोधनातूनही स्पष्ट होऊ लागली आहे. शेतीतून बाहेर पडण्याचे साधन म्हणजे कृषी शिक्षण असा पायंडा अधिक रूढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
----------------
- कृषिकन्यांची व्यावसायिक महत्त्वाकांक्षा (टक्के) ------------------ (पाय डायग्राम)
सरकारी नोकरी --- 83.33
गैरसरकारी संस्था --- 6.66
स्वयंरोजगार --- 6.66
खासगी क्षेत्र --- 3.35

- कृषिकन्यांचा कल -------------- (बार डायग्राम)
एमपीएससी --- 67.24
यूपीएससी --- 12.77
बॅंकिंग --- 12.22
शैक्षणिक --- 3.33
संशोधन क्षेत्र --- 2.22
बहुराष्ट्रीय कंपन्या --- 1.11
कृषी व संलग्न उद्योग --- 1.11

- विद्यार्थिनींसमोरील अडचणी (टक्के) ---------------------(बार डायग्राम)
आर्थिक अडचण --- 36.66
मार्गदर्शनाचा अभाव --- 48.22
माहितीचा अभाव --- 55.55
दुर्गम भागात वास्तव्य --- 30
परंपरागत कौटुंबिक मानसिकता --- 30
----------------

No comments:

Post a Comment