Sunday, May 18, 2014

नक्षलग्रस्त भागातील कृषी सहायकांना पदोन्नती

*कोट
नक्षलग्रस्त भागातील कृषी सहायकांना पदोन्नतीची वेतनश्रेणी मिळण्यासाठी संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यास अखेर यश आले आहे. सर्व सहायक या निर्णयाबाबत समाधानी आहेत.
- संदीप केवटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना.

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कृषी सहायकांना एकस्तर पदोन्नतीची वेतनश्रेणी देण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. कृषी सहायकांची सध्याची वेतनश्रेणी दरमहा 5200 ते 20,200 रुपये आणि 2400 ते 2800 रुपये ग्रेड पे अशी आहे. एका पदोन्नतीने ती आता कृषी पर्यवेक्षकांसमान म्हणजेच 9300 ते 34,800 रुपये व 4200 रुपये ग्रेड पे अशी होणार आहे. नक्षलग्रस्त भागातील सुमारे 600 कृषी सहायकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या 2002 च्या आदेशानुसार आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना एकस्तर पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. नजीकची वरिष्ठ किंवा पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुशंगाने वेतनश्रेणीचा लाभ या कर्मचाऱ्यांना दिला जातो. ही पदोन्नती देताना अकार्यात्मक वेतनश्रेणी विचारात घेतली जात नाही. यानुसार कृषी सहायकांच्या पदोन्नतीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असा अभिप्राय कृषी विभागाने आयुक्तांना दिला आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया सह सर्व नक्षलग्रस्त भागात पुर्वी ही वेतनश्रेणी मिळत होती. मात्र वित्तमहालेखापालांनी आक्षेप घेतल्याने गेल्या दीड दोन वर्षांपासून ही वेतनश्रेणी थांबविण्यात आली होती. आता हे आक्षेप दूर करण्यात आले आहेत. यामुळे या भागातील कृषी सहायकांना पुन्हा पुर्वीप्रमाणे कृषी पर्यवेक्षकांची वेतनश्रेणी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वाढ तत्काळ लागू होणार असल्याची माहिती आस्थापना विभागातिल सुत्रांनी दिली.

- फरकाची रक्कम मिळणार
गेल्या दोन वर्षापासून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियासह राज्याच्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सहायकांना वाढीव वेतनश्रेणी मिळालेली नाही. यामुळे आता वाढिववेतनश्रेणी देताना फरकाची रक्कमही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेतनश्रेणीवाढीबरोबरच फरकाची रक्कमही देण्याच्या सुचना कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागातून संबंधीत विभाग व जिल्ह्यांना कळविण्यात आला आहे.
-------------

No comments:

Post a Comment