Friday, May 9, 2014

आयसीएआर तयार करणार कृषी संशोधनाची डाटा बॅंक

माहिती व्यवस्थापन धोरण निश्‍चित; चार वर्षात सुरु होणार "ऑनलाईन सिस्टिम'

पुणे (प्रतिनिधी) ः देशभरातील सर्व कृषी संशोधन केंद्रांमधील सर्व अद्ययावत माहितीचे (डाटा) संकलन करुन ती ऑनलाईन डाटा मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयसीएआर) घेतला आहे. संशोधनाची चोरी, माहितीची अफरातफर आदी गैरप्रकार रोखून माहितीची विश्‍वासार्हता व उपयोगिता वाढविण्यासाठी आयसीएआरने हे पाऊल उचलले आहे. येत्या चार वर्षात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

देशभरात झालेल्या व सुरु असलेल्या कृषी संशोधनाची माहिती सध्या एकत्रिक कुठेही उपलब्ध नाही. महत्वाची माहिती चोरीला जाण्याचे वा गहाळ होण्याचे अनेक प्रकारही घडले आहेत. या पार्श्‍वभुमीवर डॉ. ए. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानुसार आयसीएआरने डाटा मॅनेजमेंट पॉलिसी तयार केली आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. आयसीएआरच्या सर्व संशोधन संस्थांमधील सर्व प्रकारची सांख्यिकी माहिती, मोजमापे, निष्कर्ष, शिफारशी, प्रयोगांच्या नोंदी, संशोधन सिद्धतेसंबंधीची सर्व माहिती, संशोधनासाठी वापरण्यात आलेले वाण, जाती, तंत्रज्ञान, विकसित औजारे, सॉफ्टवेअर, इन्फॉरमेशन सिस्टिम, संशोधनाचे उद्दीष्ट, साधणे व उपलब्धता यांचा समावेश आहे.

येत्या तीन ते चार वर्षात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पहिल्या दोन वर्षात माहिती संकलन, पृथःकरण, वर्गिकरण, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व माहिती केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर एक दोन वर्षात डाटा नेटवर्किंग व अपडेशनचे काम होणार आहे. चार वर्षात प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे उद्दीष्ट आहे. ऑनलाईन सिस्टिमच्या माध्यमातून ही सर्व माहिती खुली करण्यात येणार आहे. खुली (ओपन), नोंदणीकृत (रजिस्टर्ड) व निर्बंधित (रिस्टिक्‍टेड) अशा तीन गटात ही माहिती उपलब्ध राहील. बहुमुल्य व अल्पमुल्य अशा दोन प्रकारात ही माहिती विभागण्यात येणार आहे. माहिती संरक्षणाच्या पातळीवर सर्वासाठीची माहिती, विषयाच्या पातळीवरील सुक्ष्म माहिती, प्रयोग व सर्वेक्षण माहिती आणि उर्वरीत माहिती अशा चार गटात वर्गिकरण करण्यात येणार आहे.

संशोधनाच्या प्राथमिक स्तरावरील माहिती संबंधीत केंद्रांमध्येच साठविण्यात येणार आहे. तर पी.एचडी व एमएस्सी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून करण्यात आलेले संशोधन काही ठरावीक काळानंतर (तीन चार वर्षे) खुले करण्याचे निश्‍चित झाले आहे. या सर्व माहितीची मालकी आयसीएआरकडे राहणार आहे. संशोधन, शिक्षण, सल्ला यासह सर्व माध्यमातून तयार होणारा व वापरला जाणारा डाटा यात संकलित व संरक्षित करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी आयसीएआर पातळीवर मध्यवर्ती कक्ष (पीएमई सेल) स्थापन करण्यात आला आहे. तर सर्व संशोधन केंद्र, संस्था, संचनलनालयांच्या संचालकांमार्फत याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

माहितीचे नियमितपणे संकलन, मुल्यांकन, सुधारणा, संनियंत्रण करण्याचे काम पीएमई सेलमार्फत होईल. प्रत्येक संस्थेत एका व्यक्तीकडे माहिती संकलनाची जबाबदारी असेल. सर्व माहिती दिर्घकाळ वापरण्यायोग्य पद्धतीत असेल. यासाठी नोंदवह्याचे आराखडेही निश्‍चित करण्यात आले आहेत. डिसेंबर 2014 पर्यंत लिखित स्वरुपातील माहिती संकलित करुन त्यानंतर तिचे डिजीटलमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
------------------(समाप्त)----------------------

No comments:

Post a Comment