Saturday, May 31, 2014

मॉन्सून अंदमानात दाखल

पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती; केरळात सर्वदूर पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच रविवारी (ता.18) अंदमानात दाखल झाले आहेत. मॉन्सूनने अंदमानचा बहुतेक भाग व्यापल्याचे हवामान खात्याने रविवारी दुपारी जाहिर केले. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस हवामान अनुकूल असून मंगळवारी सकाळपर्यंत तो संपूर्ण अंदमान व्यापून बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मॉन्सूनच्या आगमनाने अंदमानात पावसाचा जोर व दक्षिण भारतात पावसाची शक्‍यता वाढली आहे. हवामान खात्याने मंगळवारी (ता.20) सकाळपर्यंत संपूर्ण दक्षिण भारतासह कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा, राजस्थान, पंजाब, हरियाणा व दिल्लीत धुळीच्या वादळाचा तर बिहार, पश्‍चिम बंगाल व ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्राबरोबरच दक्षिण भारत व दक्षिण अरबी समुद्रात बाष्पयुक्त ढगांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मॉन्सून सर्वसाधारण वेळेआधी अंदमानात दाखल झाल्याने त्याच्या पुढील वाटचालीविषयीची उत्सूकताही आणखी वाढली आहे. हवामान खात्याने मॉन्सून पाच जूनपर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज यापुर्वीच व्यक्त केला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात अंदमानात बहुतेक ठिकाणी तर आसाम, मेघालय व दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी पाऊस झाला. मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, पश्‍चिम बंगाल, जम्मू काश्‍मिरमध्येही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बिहार, पश्‍चिम बंगाल व ओडिशात उष्णतेची लाट कायम होती. या भागात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 43 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. महाराष्ट्रातही चंद्रपूर, ब्रम्हपुरी व वर्धा येथे कमाल तापमान 43 ते 44 अंशापर्यंत उंचावलेले आहे. या सर्व भागात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात आणखी दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी समुद्रीस्थितीबरोबरच उपखंडाच्या भुभागावरही अनुकूल हवामान निदर्शनास येत आहे. पश्‍चिम राजस्थान, आसाम व मेघालयात समुद्रसपाटीच्या पातळीहून 900 मिटर उंचीवर सक्रीय असलेले चक्राकार वारे सोमवारी कायम राहण्याचा अंदाज आहे. अंदमानच्या समुद्रात समुद्रसपाटीच्या पातळीपासून 5.8 किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रीय असून ते हळूहळू उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे.

उत्तर छत्तिसगडपासून तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीच्या पातळीहून 900 मिटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या पट्ट्याच्या प्रभावामुळे छत्तिसगडवरच चक्राकार वारेही सक्रीय झाले असून त्यापासून विदर्भ, कर्नाटक ते केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. हा पट्टा सोमवारी कायम राहण्याचा अंदाज आहे. या सर्व हवामान स्थितींच्या (सिस्टिम्स) प्रभावामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये ढगांच्या प्रमाणात वाढ झाली असून पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता वाढली आहे.
---------(समाप्त)---------

No comments:

Post a Comment