Saturday, May 31, 2014

उन्हाळी पावसात देशात सर्वाधिक वाढ मराठवाड्यात

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस वाढला; मार्च-एप्रिलमधील गारपिटीचा परिणाम

पुणे (प्रतिनिधी) ः मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी झालेली जोरदार गारपीट, अवकाळी पाऊस व पाठोपाठ आता ठिकठिकाणी होत असलेला वादळी पाऊस यामुळे राज्यात सर्वत्र उन्हाळी पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यातही मराठवाड्यात या पावसाचे प्रमाण तब्बल तिपटीने वाढले आहे. देशातील इतर सर्व उपविभागांच्या तुलनेत हे प्रमाण शेकड्याने अधिक आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही उन्हाळी पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या गेल्या अनेक दशकांच्या आकडेवारीनुसार सर्वसाधारणपणे दर महिन्यात कुठे ना कुठे पाऊस पडतो. त्यातही एक मार्च ते 31 मे हा कालावधी पुर्वमोसमी मानला जातो. या कालावधीत उत्तोरोत्तर वळवाच्या, वादळी पावसात वाढ होत जाते. यंदा मात्र या कालखंडाच्या सुरवातीलाच मार्चच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी जोरदार गारपीट व वादळी पाऊस झाला. यामुळे उन्हाळी पावसाचे चित्रच पालटून गेले आहे. एप्रिल व मेमध्ये झालेल्या पावसाने त्यात अधिक भर टाकली आहे.

हवामान खात्याच्या गेल्या तीन महिन्याच्या पावसाच्या आकडेवारीनुसार सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाच्या प्रमाणात झालेली वाढ ही देशात सर्वाधिक आहे. मुळात मराठवाडा हा तसा कमी पावसाचा प्रदेश असल्याने ही वाढ विशेष मानली जात आहे. विदर्भातही पावसाच्या प्रमाणात एक पटीने वाढ झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातही हे प्रमाण वाढले आहे. या पावसाचा येत्या मॉन्सूनवर काय परिणाम होईल याविषयी हवामान तज्ज्ञांमध्ये उत्सूकतेचे वातावरण आहे.

- दुष्काळी भागातच वाढला पाऊस
गेल्या तीन महिन्याच्या आकडेवारीवरुन देशातील दुष्काळी भागातच प्रामुख्याने उन्हाळी पावसाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येते. तेलंगणात हा पाऊस 129 टक्‍क्‍यांनी, पश्‍चिम राजस्थानात 133 टक्‍क्‍यांनी, पुर्व राजस्थानात 69 टक्‍क्‍यांनी, उत्तर कर्नाटकात 88 टक्‍क्‍यांनी, दक्षिण कर्नाटकात 30 टक्‍क्‍यांनी पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे, हे विशेष. काही अपवाद वगळता नैऋत्य मोसमी पाऊस जास्त पडणाऱ्या भागात उन्हाळी पाऊस कमी पडल्याचे चित्र आहे.

*चौकट
- उन्हाळी पाऊस (2014)
विभाग --- 1 मार्च ते 25 मे, सरासरी (मिलीमिटर) --- पडलेला पाऊस (मिलीमिटर--- सरासरीहून अधिकचा पाऊस (टक्के)
कोकण --- 21.1 --- 28.2 --- 34
मध्य महाराष्ट्र --- 29.3 --- 50.6 --- 73
मराठवाडा --- 24 --- 89.9 --- 275
विदर्भ --- 27.4 --- 56.1 --- 105
--------------- 

No comments:

Post a Comment