Sunday, May 18, 2014

जगाचे लक्ष लोकसभा निकालाकडे !

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या काही महिन्यांच्या राजकीय धुलवडीनंतर देशातील लोकशाहीचा सर्वाधिक मोठा सोहळा असलेल्या लोकसभा निवडणूकीचे निकाल आज (शुकवार, ता.16) जाहिर होणार आहे. नऊ टप्प्यात मतदान झालेल्या 543 मतदारसंघांच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कडेकोट बंदोबस्तात सकाळीच मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत एकूण निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वप्रथम लागण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक आयोगाने पोलिसांच्या फौजफाट्यासह देशभरातील सर्व मतमोजणी केंद्रांवर जय्यत तयारी केली आहे. सकाळी 10 वाजेपासून विविध मतदारसंघांचे निकाल हाती येण्याची शक्‍यता आहे. दुपारपर्यंत निकालाचा आणि देशभरातील सत्तास्थापनेचा कल स्पष्ट होईल. विजयी व पराभूत उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी पुणे व मुंबईसह अनेक ठिकाणी शुक्रवारी मिरवणूका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांची परवानगी घेऊन शनिवारपासून मिरवणूका काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

केंद्रात सत्तास्थापनेच्या बहुमतासाठी 272 जागांची आवश्‍यकता असते. विविध संस्थांच्या जनमत चाचण्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचे निष्कर्ष व्यक्त झाल्यानंतर भाजपच्या उत्साहाला उधान आले आहे. निकाल लागण्याआधीच बहुमताच्या विश्‍वासावर पंतप्रधानपदाचे दावेदार असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संभाव्य केंद्रीय मंत्र्यांची यादी तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे. दुसरीकडे कॉग्रेसने संयमाची भुमिका घेत निकालावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर त्रिशंकु परिस्थिती निर्माण होण्याचे आखाडे बांधत काही पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व मुलायमसिंग यादव यांची नावे विशेष चर्चेत आहेत.
------------

No comments:

Post a Comment