Thursday, May 15, 2014

मॉन्सूनची अनुकुलता वाढली

अंदमानात सर्वदूर पावसाचा अंदाज; बिहार, झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) 17 मे पर्यंत अंदमानात पोचण्यासाठीची विविध हवामान घटकांची अनुकूलता आणखी वाढली आहे. श्रीलंकेचा दक्षिण भाग व अंदमान नजीकच्या समुद्रात बाष्पयुक्त ढगांची दाटी वाढली आहे. हवामान खात्याने गुरुवारी (ता.15) अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वदूर मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याच वेळी बिहार, झारखंड, ओदिशा व पश्‍चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी (ता.14) सकाळपर्यंतच्या चोविस तासात मॉन्सूनच्या वाटचालीच्या दृष्टीने महत्वपूर्ण हालचाली झाल्या. दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात बाष्पयुक्त ढगांच्या प्रमाणात आणखी वाढ झाली. याच वेळी उत्तर भारतात गेली काही दिवस पाऊस पडण्यास कारणीभूत असलेल्या काही हवामानस्थितींचा प्रभाव ओसरला तर काहींचा प्रभाव ओसरण्यास सुरवात झाली. याबरोबरच उत्तर भारतात ठिकठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली असून हवामान खात्याने बिहार, झारखंडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. या तिनही घडामोडी मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अधिक उपयुक्त ठरणार असल्याची माहिती हवामान विभागातील सुत्रांनी दिली.

दक्षिण छत्तिसगड, तेलंगणा, तामिळनाडू ते कन्याकुमारीच्या समुद्री भागापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा ओसरला आहे. राजस्थान व लगतच्या भागात समुद्रसपाटीच्या पातळीहून दीड किलोमिटर उंचीवर सक्रीय असलेले चक्राकार वारे गुरुवारी (ता.15) ओसरण्याची चिन्हे आहेत. आसाम, मेघालय व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातील चक्राकार वारे गुरुवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. हरीयाना व लगतच्या भागावरील चक्राकार वारे बुधवारी उत्तर प्रदेश व झारखंडवरुन पुर्वेकडे चिनच्या दिशेने सरकत आहेत.

उत्तर भारतात ठिकठिकाणी सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस पुढील दोन दिवसात कमी होण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू आणि उत्तरेकडील राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा राज्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. याच वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह मध्य भारतात हवामान कोरडे आहे. येत्या 16 मे पासून कर्नाटकसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील कोरडे हवामान पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.
-------------

No comments:

Post a Comment