Thursday, May 15, 2014

महाराष्ट्र ठरतेय सर्वाधिक दुष्काळी राज्य, राजस्थानशी बरोबरी

दर दीड दोन वर्षाला दुष्काळ; यंदाही टंचाईचे आव्हाण

पुणे (प्रतिनिधी) ः देशात गेली अनेक वर्ष राजस्थान हेच सर्वाधिक दुष्काळी राज्य समजले जाते. मात्र आता वारंवार पडणाऱ्या दुष्काळांमुळे महाराष्ट्र राजस्थानच्या पंक्तीत जावून बसला आहे. गेल्या 14 वर्षामध्ये दर दीड ते दोन वर्षात एकदा महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. यामुळे या राज्यांतील शेतीपुढे व विशेषतः येत्या खरीप हंगामापुढे मोठे आव्हान असल्याचे केंद्रीय कृषी विभागाने म्हटले आहे.

देशातील सर्व राज्यांतील रब्बीचा आढावा व येत्या खरिपाच्या तयारीबाबतची बैठक नुकतिच दिल्लीत पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषी आयुक्त जे. एस. सिंधु यांनी ही धक्कादायक वस्तुस्थिती स्पष्ट केली. गेल्या 14 वर्षात देशातील 18 राज्यांना कमी अधिक प्रमाणात दुष्काळाचा फटका बसला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दुष्काळाची वारंवारता अधिक असल्याचे श्री. सिंधू यांनी आपल्या सादरीकरणात स्पष्ट केले आहे.

दुष्काळांच्या वारंवारतेनुसार महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व कर्नाटक या पाच राज्यांना दर दीड ते दोन वर्षातून एकदा दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. त्यापाठोपाठ झारखंड, ओदीशा, बिहार, केरळा व उत्तराखंड या राज्यांना दर तीन ते चार वर्षातून एकदा, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशला चार ते पाच वर्षातून एकदा तर पश्‍चिम बंगाल व छत्तिसगड या राज्यांना सहा किंवा त्याहून अधिक वर्षातून एकदा दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे केंद्रीय कृषी आयुक्तालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

- 449 जिल्ह्यांचे आपत्कालिन नियोजन
गेल्या दशकभरातील स्थिती व यंदाचा संभाव्य कमी पाऊस या पार्श्‍वभूमीवर यंदा खरिपात 23 राज्यांतील 449 जिल्ह्यांना पावसाचा फटका बसण्याची प्राथमिक शक्‍यता आहे. या सर्व जिल्ह्यांचे आपत्कालिन नियोजन संबंधीत राज्यांमार्फत केंद्रीय कृषी विभागाला सादर करण्यात आले आहे. यामध्ये पाऊस लांबल्यास, खंड पडल्यास, जास्त किंवा कमी पाऊस झाल्या, मॉन्सून कमी बरसल्यास किंवा लवकर संपल्यास करावयाच्या उपाययोजनांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणांमार्फत प्रसंगानुरुप या नियोजनानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन आहे.

*खरीपासाठी केंद्रीय कृषी विभागाच्या सुचना
- कमी कालावधीच्या पिकांच्या बियाण्याचा पुरेसा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध करा
- खते, बियाणे, औषधे पुरेशा प्रमाणात वेळेआधी शेतकऱ्यांपर्यंत पोचवा
- पेरणी वेळेवर होईल याची काळजी घ्या
- एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्या
- वित्त, वीज व सिंचन विभागांशी समन्वय राखा
- सर्व प्रकारचे परवाने देण्याची प्रक्रीया वेळेत पार पाडा
- आवश्‍यकतेनुसार आत्मा, अन्न सुरक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मदतीस घ्या
- कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांचा खरिप नियोजन व अंमलबजावणीत सक्रीय सहभाग वाढवा
- खरीप कार्यवाही व अडचणींची माहिती वेळोवेळी केंद्रीय कृषी विभागाला कळवा
-------------------------------

No comments:

Post a Comment