Friday, May 9, 2014

अॅग्रीइनोव्हेटीव इंडिया, आयसीएआर प्रोजेक्ट


पुणे (प्रतिनिधी) ः जनावरांमधील लाळ्या खुरकुत रोग निर्मुलनाची लस निर्मितीसाठी इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बेंगलोरमधील क्षेत्रावर सार्वजनिक खासगी भागिदारीतून (पीपीपी) लस निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयसीएआर) घेतला आहे. आयसीएआरच्या ऍग्रीइनोव्हेट इंडिया प्रा. लि. या कंपनीकडे या प्रकल्पासाठी भागीदार निश्‍चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून कंपनीमार्फत याबाबतची कार्यवाही सुरु झाली आहे.

देशातील शासकीय कृषी संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, संशोधन, पिक लागवड साहित्य, लसी, यंत्रे व अवजारे, मुल्यवर्धीत निविष्ठा आदी उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याबरोबरच आर्थिक उत्पन्नवाढीच्या दृष्टीने केंद्रीय कृषी मंत्रालायमार्फत आयसीएआरअंतर्गंत 2011 मध्ये ऍग्रीइनोव्हेट इंडिया प्रा. लि. कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. देशातील कृषी संशोधन, शिक्षण व मनुष्यबळ विकासाला सार्वजनिक, खासगी भागिदारीतून चालना देण्याचे काम या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीमार्फत सध्या लाळ्या खुरकुत लस निर्मिती प्रकल्प, उति संवर्धित तेलताड रोप निर्मिती व मनुष्यबळ क्षमतावृद्धीच्या प्रकल्पांवर काम सुरु करण्यात आले आहे.

देशात उपलब्ध असलेल्या कृषी शास्त्रज्ञांना अधिकाधिक वाव देण्यासाठी व त्यांचा अधिकाधिक उपयोग करुन घेण्यासाठी सर्व शास्त्रज्ञांची माहिती संकलित करण्याचा प्रकल्पही ऍग्रीइनोव्हेटमार्फत राबविण्यात येत आहे. यापैकी आयसीएआरच्या सेवेतून निवृत्त झालेल्या शास्त्रज्ञांच्या माहिती संकलनाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या माहितीनुसार आता विषयनिहाय सल्लागार शास्त्रज्ञ मंडळे तयार करण्यात येणार असून विविध खासगी कंपन्या, विकसनशिल देश यांना शास्त्रज्ञांची सल्ला सेवा सशुल्क पुरविण्याचे कंपनीचे नियोजन आहे. यातही आफ्रिकन व आशियायी देशांना विविध प्रकारच्या सेवांची विक्री करण्यावर आयसीएआरमार्फत अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

ऍग्रीइनोव्हेट इंडिया मार्फत आयसीएआरच्या विविध संसोधन केंद्रांनी केलेल्या संशोधन व तंत्रज्ञान सार्वजनिक, खासगी भागिदारीतून लोकप्रिय करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत. बियाणे व लागवड साहित्य, पिक संरक्षण पद्धती व जैविक फॉरम्युलेशन्स, अन्न प्रक्रीया व काढणी पश्‍चात व्यवस्थापन, पशुउपचार व लसी, शेती यंत्रे व अवजारे असे हे गट असून याबाबतचे तंत्रज्ञान खासगी कंपन्यांच्या गुंतवणूकीतून देशभर पोचविण्याची दिशा आयसीएआरमार्फत निश्‍चित करण्यात आली आहे. आयसीएआरचे महासंचालक व ऍग्रीइनोव्हेट कंपनीचे अध्यक्ष डॉ. एस. अय्यपन यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात नुकत्याच झालेल्या आयसीएआरच्या संचालकांच्या बैठकीत ऍग्रीइनोव्हेटच्या कामास अधिक गती देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

आयसीएआर करणार "कॉन्ट्रॅक्‍ट रिसर्च'
खासगी कंपन्यांना आवश्‍यक असलेले कृषी व संलग्न विषयातील संशोधन करुन देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आयसीएआरने घेतला आहे. यासाठीचे मुल्यांकन, संशोधन कराराचे स्वरुप व शुल्कनिश्‍चिती, सल्ला सेवा, ब्रॅंडींग याची जबाबदारी ऍग्रीइनोव्हेट इंडियाकडे सोपविण्यात आली आहे. याशिवाय इतर देशांमध्ये संशोधन व विकास क्षेत्र (आर ऍण्ड डी फार्म) उभारुन आंतरराष्ट्रीय पातळीवर चाचण्या घेण्याची सुविधाही उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय साहित्य निर्मिती, सर्वेक्षण, अभ्यास प्रकल्प, तंत्रज्ञान विकास, मुल्यांकन अहवाल, तांत्रिक सल्ला, संशोधनातील अडचणी सोडवणे आदी प्रकारच्या सशुल्क सेवा सुरु करण्यात येणार आहेत.
----------------

No comments:

Post a Comment