Monday, May 5, 2014

अॅग्रोवन गारपीटग्रस्त गाव सरपंच पहाणी अहवाल


हजारो गारपीटग्रस्त मदतीविनाच !

राज्यभरातील सरपंचांची तिव्र नाराजी; तत्काळ मदत देण्याची मागणी

टीम ऍग्रोवन
पुणे ः राज्य शासन एकीकडे मदत वाटपाबाबत आश्‍वासनांवर आश्‍वासने देत असताना दुसरीकडे राज्यातील लाखो गारपीटग्रस्तांना अडीच तीन महिने उलटूनही अद्याप मदत मिळू शकलेली नाही. अनेक ठिकाणी तर पंचनामेच पूर्ण झालेले नाहीत. काही ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचनाम्यात नुकसानीचे प्रमाण मुद्दाम कमी दाखविण्याचेही प्रकार घडल्याचा आरोप आहे. पंचनाम्यातील हे सर्व गैरप्रकार उघड करतानाच मदत मिळण्यात होत असलेल्या अक्षम्य विलंबाबाबत राज्यभरातील सरपंचांनी ऍग्रोवनकडे तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्यात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे सुमारे 20 लाख हेक्‍टरहून अधिक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीनंतर कमी अधिक वेगाने पंचनामेही झाले आणि त्यापाठोपाठ मदतीचीही घोषणा झाली. या पार्श्‍वभूमीवर गारपीट, पंचनामे आणि मदतीबाबत गारपीटीचा मोठा फटका बसलेल्या सर्व तालुक्‍यांतील प्रमुख गावांच्या सरपंचांशी ऍग्रोवनच्या राज्यभरातील बातमीदारांनी संपर्क साधला असता बहुतेक सरपंचांनी नाराजी व्यक्त केली. विदर्भातील 100, मराठवाड्यातील 83, मध्य महाराष्ट्रातील 48 आणि खानदेशातील 25 प्रातिनिधीक सरपंचाशी या पहाणीत सपर्क साधण्यात आला.

- पंचनाम्यांचा विलंब भोवला
सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 80 टक्‍क्‍यांहून अधिक गावांमध्ये गारपीट झाल्याबरोबर पंचनामे झालेले नाही. काही भागात दोन दिवसांनंतर तर बहुतेक ठिकाणी चार आठ दिवसांनंतर पंचनाम्यांना सुरवात झाली. काही ठिकाणी तर महिनाभर टप्प्याटप्प्याने हे काम सुरु होते. वास्तविक नुकसानीची तिव्रता योग्य प्रकारे समजण्यासाठी गारपीट झाल्यानंतर लगेच किंवा फार तर एक दोन दिवसात पंचनामे करणे अत्यावश्‍यक ठरते. मात्र आदेश नाही, अधिकारी नाहीत आदी कारणे दाखवत पंचनाम्यांकडे कानाडोळा करण्यात आला. यामुळे नुकसान जास्त असूनही कमी नोंदविल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

- मराठवाड्यात सर्वाधिक तक्रारी
दरम्यान, मराठवाड्यातील सरपंचांनी गारपीटीच्या पंचनाम्यांबाबत सर्वाधिक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अनेक गावांमध्ये पंचनामेच झाले नसल्याच्या तक्रारी असून काही ठिकाणी नुकसान कमी दाखवले, ऊस, फळपिके, जनावरांच्या नुकसानीची नोंदच घेतली नाही अशा स्वरुपाच्या तक्रारींची संख्याही मोठी आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणीत याबात मोठी असमाधानकारक स्थिती आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय काही गावांनी घेतला होता. यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मदतीचे आश्‍वासन दिल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. अद्यापही अनेक गावे पंचनाम्यांच्याच प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे प्रशासनमात्र पंचनामे पूर्ण केल्याचे दावे करत आहे.

- पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भात संमिश्र स्थिती
पंचनामे व मदतीबाबत पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश व विदर्भात संमिश्र स्थिती आहे. अनेक सरपंचांनी या सर्व प्रक्रीयेवर समाधान व्यक्त केले आहे. त्याच वेळी अनेक जागरुक सरपंचांनी पंचनाम्यातील तृटींवर बोट ठेवत नापसंती व्यक्त केली आहे. गांभिर्याने पंचनामे झाले नाहीत, दुबार गारपीटीचे पंचनामे झाले नाहीत, नुकसान कमी नोंदवले, ग्रामसेवकांच्या संपामुळे पंचनामे अर्धवट झाले अशी कैफियत विदर्भातील सरपंचांनी मांडली आहे. विशेषतः बुलडाणा, अकोला व लगतच्या जिल्ह्यांमध्ये या प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.
------------------------
- गहू, ज्वारीला वगळले
""मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली. त्यानंतर चार दिवसांनी थोड्याफार फळबागांचे पंचनामे झाले. पण गहू व ज्वारीचे नुकसान व क्षेत्र मोठे असूनही पंचनामेच झालेले नाहीत. पंचनाम्यांबाबत वारंवार मागण्या तक्रारी करुनही दखल घेण्यात आली नाही.''
सुनील पवार, सरपंच, सोमुर्डी, ता. पुरंदर, जि. पुणे
---------------------
- 100 टक्के पंचनामे बाकी
""मार्चमध्ये गारपीट झाली. गहू, हरभरा गेलाच पण कांद्याचे 500 हेक्‍टरहून अधिक नुकसान झाले. तहलीसदार, तालुका कृषी अधिकार्यांनी पाहणी केली. पण यानंतरही एकाही शेतकर्यांचा पंचनामा झाला नाही. अधिकारी पंचनाम्याचे आदेश नाहीत म्हणतात. तहसीलदार, प्रांताकडे तक्रार करुनही अद्यापही पंचनामे झालेले नाहीत.''
सुभाष निकम, सरपंच, नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक
----------------------
- जनावरे, ऊस वाऱ्यावर
27 फेब्रुवारी व 3 मार्चला गारपीट झाली. घरांच्या नुकसानीची मदत मिळाली, मात्र जनावरे मोठ्या प्रमाणात जखमी होऊनही मदत मिळाली नाही. उसाचे पंचनामे झालेले नाहीत. सर्व नुकसानीची मदत तातडीने मिळावी.''
संतोष वारगड, सरपंच, रामवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर
-----------------------
- मृत मेंढ्यांची दखलच नाही
""मार्चच्या पहिल्या आठवड्यात 1400 हेक्‍टरवरील पिकांचे 100 टक्के नुकसान झाले. प्रत्यक्षात निम्म्या क्षेत्राचे पंचनामे झालेच नाहीत. केलेल्या पंचनाम्यांतही नुकसानीचे प्रमाण निम्म्याने कमी दाखविण्यात आले. हजाराहून अधिक मेंढ्या गारपीटीने मेल्या. केंद्रीय पथकाने धावती भेट देवूनही नुकसानीची योग्य दखल घेण्यात आली नाही.''
सिताराम मारनर, सरपंच, भदाणे, ता. जि. धुळे
----------------
- पंचनामे चुकीचे, रकाने मोकळे
""पंचनामे झाले मात्र नुकसानीचे रकाने मोकळेच सोडले. नुकसान 50 टक्‍क्‍यांहून जास्त असताना अधिकार्यांनी कमी नुकसान दाखवले. अद्याप काहीच मदत मिळालेली नाही.''
सखाराम शिंदे (ब्रम्हगाव, पैठण, औरंगाबाद), कल्याण देहाडे (गारखेडा, औरंगाबाद), भिमराव नलावडे (बाजारसावंगी, खुलताबाद, औरंगाबाद)
---------------
- पंचनामेही नाहीत अन्‌ मदतही नाही
""नऊ मार्चला गारपीटीने मोठे नुकसान झाले. मात्र अद्यापही पंचनामे झाले नाहीत. पंचनामे झाले नसल्याने गावाने मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र पुढारी व प्रशासनाच्या विनंत्यांमुळे मागे घेतला. यानंतरही पंचनामे झालेले नाहीत, मदतही मिळालेली नाही.''
काशिनाथ गोरे, सरपंच, बानेगाव, ता. घनसांगवी, जि. जालना
-----------------
- अधिकारी आले, फोटो काढून गेले
""मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली. अधिकारी गावात फक्त फोटो काढून गेले. पंचनामे झालेच नाहीत. परस्पर अहवाल पाठवला. नुकसानीचे निकष वस्तुस्थितीनुसार ठरवून मदत मिळावी.''
नारायण धस, अल्लापूर पांढरी, ता.जि. परभणी
-----------------
- दुबार गारपीटीचे पंचनामे नाहीत
""पहिल्यांदा गारपीट झाल्यावर पंचनामे झाले. मात्र दुसर्यांदा गारपीटीत मोठे नुकसान होऊनही अधिकाऱ्यांनी पंचनाम्यास नकार दिला. पंचनाम्यांचे अधिकार ग्रामसभेस द्यावेत.''
सौ. शारदा फरपट, सरपंच, सुजातपूर, नांदुरा, बुलडाणा
-----------------
- पंचनामे पंचायतीच्या टेबलावर
""23 फेब्रुवारीच्या गारपीटीत गावातील 953 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. हे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर झालेच नाहीत. गावात बसल्या जागी टेबलावर पंचनामे करण्यात आले. नुकसानीचे प्रमाणही योग्य लिहीले नाही.''
संदीप इंगळे, सरपंच, हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला
---------------
- नुकसान चार एकरचे, नोंद दोन एकराची
""संपामुळे ग्रामसेवक पंचनाम्यास आले नाहीत. पालकमंत्र्यांनी गावास भेट दिल्यावर पंचनामे झाले. मात्र नुकसान कमी प्रमाणात नोंदविण्यात आले. चार एकराचे नुकसान असेल तर दोन एकराचेच नुकसान दाखवले. अशाच पद्धतीने पंचनामे झाले. तक्रारीची दखलही घेतली नाही.''
दिपमाला दामदर, सरपंच, दानापूर, ता. तेल्हारा, जि. अकोला
--------------

No comments:

Post a Comment