Monday, April 14, 2014

अंदाज उत्पादनाचा - भाग 1

अन्नधान्य उत्पादनात
खरिप दुष्काळीच

कापूस, सोयाबीनची मोठी आघाडी

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या हंगामात सर्व जिल्ह्यांत चांगला पाऊस होऊनही राज्यात प्रमुख खरिप पिकांचे जेमतेम दुष्काळी वर्षांएवढेच उत्पन्न हाती येणार आहे. सुमारे 76 लाख 56 हजार टन अन्नधान्य, 14 लाख 57 हजार टन कडधान्य तर 50 लाख 58 हजार टन तेलबियांचे उत्पादन होणार आहे. तेलबिया, ज्वारी, भात आदी पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता या तिन्ही आघाड्यांवर फटका बसल्याचे चित्र आहे.

खरिप पिकांची काढणी करताना महसूल मंडळ पातळीवर घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षावरुन कृषी विभागाने खरिपाच्या उत्पन्नाचा सुधारीत अंदाज नुकताच केंद्र शासनाला कळविला आहे. राज्यात 2012-13 च्या खरीपात अत्यल्प पावसामुळे दुष्काळ लांबला होता. त्या स्थितीतही आलेल्या उत्पादनापेक्षा गेल्या 2013-14 या हंगामात अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यात खरिप ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक 40 टक्‍क्‍यांनी घटले आहे. सरासरीच्या तुलनेत हीच घट 50 टक्के आहे. तुर, उडीद, भुईमुग, तीळ, कारळे या पिकांचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने उत्पादन घटीचे गांभिर्य आणखी वाढले आहे.

सोयाबीन व कापूस या दोन पिकांचा अपवाद सोडला तर राज्यातील उर्वरीत सर्व पिकांच्या बाबतीत मोठी पिछेहाट झाली आहे. गेल्या खरीपात भात, ज्वारी, बाजरी, रागी, तुर, मुग, उडीद, भुईमुग, तीळ, कारळे, सुर्यफुल, कापूस या सर्वच पिकांच्या क्षेत्रात मोठी घट झाली. काही पिकांचे क्षेत्र तर सरासरीहूनही मोठ्या प्रमाणात कमी झाले. पाठोपाठ पावसातील खंड व ऐन पिक काढणीच्या वेळी झालेली अतिवृृष्टी, जोरदार पावसाचा फटकाही या पिकांना बसला. याचे पडसाद उत्पादनात उमटले आहेत.

खरिपात 40 लाख 52 हजार हेक्‍टरवर अन्नधान्याची पेरणी झाली होती. त्यापासून हेक्‍टरी 1.9 टन सरासरी उत्पादकतेने 76 लाख 56 हजार टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे. मका या एकमेव पिकाचा अपवाद वगळता या गटातील ज्वारी, भात, बाजरी, रागी या चारही प्रमुख अन्नधान्य पिकांना कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. कडधान्याची 19 लाख 79 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यापासून हेक्‍टरी 736 किलोच्या सरासरी उत्पादकतेने 14 लाख 57 हजार टन उत्पादन होणार आहे. तेलबियांची 41 लाख 96 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यात हेक्‍टरी 1.2 टन सरासरी उत्पादकतेने एकूण 50 लाख 58 हजार टन उत्पादनाचा अंदाज आहे.

- सोयाबीनेतर तेलबियांवर संक्रात
गेल्या काही वर्षात सोयाबीनच्या क्षेत्रात प्रचंड मोठी वाढ होऊन ते राज्यातील सर्वात मोठे खरिप पिक बनले आहे. गेल्या खरिपात तर एकूण तेलबिया क्षेत्रापैकी सुमारे 94 टक्के क्षेत्र (39.17 लाख हेक्‍टर) एकट्या सोयाबीनचे होते. या सोया आग्रमनापुढे इतर तेलबिया पुरत्या निष्प्रभ ठरल्या असून खरिप भुईमुग, तीळ, कारळे, सुर्यफुल आदी तेलबिया पिकांच्या क्षेत्रात व उत्पादनात तब्बल 20 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा तब्बल 95 टक्के आहे.

- कपाशीची आघाडी कायम
कापूस पिकाच्या क्षेत्रात यंदा तीन लाख हेक्‍टरने घट होऊनही उत्पादनातील चढता आलेख कायम राहीला आहे. सरासरी प्रति हेक्‍टरी उत्पादकतेत 33 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन यंदा 83 लाख 78 हजार गाठी कापूस उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. हे उत्पादन सरासरीहून सुमारे 25 लाख तर आधीच्या वर्षाहून 15 लाख गाठींनी अधिक आहे. क्षेत्राच घट आणि उत्पादन व उत्पादकेत वाढ असे कापसाचे सकारात्मक चित्र आहे.

- उत्पादकता वाढीची उड्डाणे
आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या खरिपात बाजरीची उत्पादकता 49 टक्‍क्‍यांनी, मक्‍याची 45 टक्‍क्‍यांनी, सुर्यफुलाची 40 टक्‍क्‍यांनी तर कारळ्याची 16 टक्‍क्‍यांनी वाढल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मुख्य पिकांव्यतिरिक्त सर्वसाधारणपणे उल्लेखही न करता इतर या गटात समावेश करण्यात येणाऱ्या गौन (इतर) अन्नधान्याची 24 टक्‍क्‍यांनी, गौन कडधान्यांची 50 टक्‍क्‍यांनी तर गौन तेलबियांची उत्पादकता 45 टक्‍क्‍यांनी वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- खरिप उत्पादनाचा पिकनिहाय अंदाज (2013-14)
पिक --- क्षेत्र ( लाख हेक्‍टर) --- उत्पादन (लाख टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
भात --- 15.13 --- 28.45 --- 1880
ज्वारी --- 6.18 --- 7.27 --- 1177
बाजरी --- 8.12 --- 6.69 --- 947
रागी --- 1.02 --- 1.17 --- 1147
मका --- 9.55 --- 31.71 --- 3319
तुर --- 10.96 --- 9.73 --- 888
मुग --- 4.48 --- 2.33 --- 530
उडीद --- 3.29 --- 2.02 --- 612
भुईमुग --- 1.96 --- 2.28 --- 1163
तिळ --- 0.23 --- 0.07 --- 283
कारळे --- 0.22 --- 0.08 --- 348
सुर्यफुल --- 0.24 --- 0.14 --- 572
सोयाबीन --- 39.17 --- 47.97 --- 1225
कापूस (गाठी) --- 38.72 --- 83.78 --- 368
ऊस --- 9.37 --- 753.84 --- 80
(कापूस उत्पादन लाख गाठींमध्ये, प्रति गाठ 170 किलो प्रमाणे, ऊस उत्पादकता टनामध्ये)
-----------(समाप्त)---------

No comments:

Post a Comment