Wednesday, April 16, 2014

19 मतदारसंघांत आज मतदान

358 उमेदवार रिंगणात

पुणे (प्रतिनिधी) ः कोकणातील एक, मराठवाड्यातील सहा आणि मध्य महाराष्ट्रातील 12 अशा एकूण 19 लोकसभा मतदारसंघात आज (ता.17) 16 व्या लोकसभेसाठी मतदान होत आहे. निवडणूकीच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण 358 उमेदवार या निवडणूकीत आपले कर्तृत्व आजमावत असून त्यात 24 महिला आणि 201 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सुमारे 36 हजार 879 मतदार केंद्रांमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान मतदान होणार आहे.

ेदेशातील 12 राज्यातील लोकसभेच्या 121 जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. यात कर्नाटकातील सर्वाधिक 28, राजस्थानमधील 20, ओदिशा व उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी 11 तर मध्य प्रदेशमधील 10 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील 10 जागांसाठी यापुर्वीच मतदान पार पडले असून 19 जागांसाठी आज तर उर्वरीत 19 जागांसाठी 24 एप्रिलला मतदान होणार आहे. आज होणार्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 44 हजार 225 मतदान यंत्र वापरण्यात येणार असून त्यांच्या संरक्षणासाठी दोन लाख 76 हजार 5922 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

काही अपवाद वगळता राज्यात आज होणाऱ्या बहुतेक लढती चुरशीच्या होण्याची शक्‍यता आहे. सुप्रिया सुळे, गोपिनाथ मुंडे, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, सुरेश धस, शिवाजीराव आढळराव पाटील, निलेश राणे, पद्मसिंह पाटील, उदयनराजे भोसले, शेतकरी नेते राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत आदींचे राजकीय भवितव्यावर आज मतदारांकडून शिक्कामोर्तब होणार आहे. त्यातही माढा, बीड, शिरुर, पुणे, हातकणंगले, नांदेड, सातारा येथिल लढतींकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
------------(समाप्त)----------

No comments:

Post a Comment