Sunday, April 20, 2014

कोकणेतर महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः येत्या बुधवारी सकाळपर्यंत (ता.23) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणात प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत असलेला वादळी पाऊस पुढची आठ दिवस कायम राहण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. विदर्भात बाष्पयुक्त ढगांची दाटी अधिक असून उर्वरीत महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळलेले आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणात अनेक ठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली. औरंगाबाद येथे सर्वाधिक 20 मिलीमिटर तर परभणी, उदगीर, सातारा व कोल्हापूर येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे या भागात अनेक ठिकाणी पिके, झाडांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून तीन ते सहा अंशांनी उंचावलेला होता. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक 41.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. ढगाळ हवामान कायम असल्याने पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यताही कायम आहे. बुधवारपर्यंत किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः पुणे 39.8, नगर 39.6, जळगाव 39.5, कोल्हापूर 34.4, महाबळेश्‍वर 32.4, मालेगाव 40.2, नाशिक 37.2, सांगली 35, सातारा 38.8, सोलापूर 39, मुंबई 32, अलिबाग 30.3, रत्नागिरी 33, पणजी 34.3, डहाणू 31.4, भिरा 40.5, उस्मानाबाद 37.9, औरंगाबाद 37.2, परभणी 39, नांदेड 40, बीड 38.6, अकोला 40.6, अमरावती 40.4, बुलडाणा 37, ब्रम्हपुरी 41.9, चंद्रपूर 37, गोंदिया 39.3, नागपूर 40.1, वाशिम 38.8, वर्धा 41, यवतमाळ 38.8
---------(समाप्त)---------

No comments:

Post a Comment