Wednesday, April 16, 2014

शेतकरी संघटनांतील राजकीय झुंज टिपेला

साखर कारखानदारांचीही कसोटी; बळीराजाचा कौल ठरणार महत्वाचा 

पुणे (प्रतिनिधी) ः ऊस व इतर शेतमालाच्या भावावरुन साखर कारखानदार व शासनाशी झुंजणाऱ्या राज्यातील शेतकरी संघटना या लोकसभा निवडणूकीत आपापसातच झुंजत आहेत. तर दुसरीकडे आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सहकारी व खासगी कारखानदारांचीही कसोटी लागली आहे. राज्यभरातील बळीराजा गुरुवारी आपल्या मतदानातून या सर्वांच्या राजकीय भवितव्याच्या दशा आणि दिशा निश्‍चित करणार आहे. 

राज्यभर पडघम वाजत असलेल्या या लोकसभा निवडणूकीत राजू शेट्टींची स्वामीभानी शेतकरी संघटना महायुतीच्या झेंड्याखाली तर रधुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना आप चा झाडू हातात घेऊन रिंगणात उतरली आहे. हातकणंगले मतदार संघात शेट्टी व रघुनाथदादा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. स्वाभीमानीचे सदाभाऊ खोत हे साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात माढ्यातून कडवी लढत देत आहेत. याशिवाय संघटनांचे अनेक लहानमोठे नेते या निवडणूकीत विविध पक्षांसाठी मोलाची भुमिका पार पाडताना दिसत आहेत. 

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने कार्यकर्त्यांना त्यांना वाटेल त्या पक्षाकडून किंवा पक्षासाठी लढण्याची मोकळीक दिली आहे. यामुळे या संघटनेचे अनेक नेते आप व इतर पक्षांच्या पाठीशी सक्रीयपणे उभे राहीले आहेत. एरवी एकमेकांसमोर येण्याचेही टाळणारे पाशा पटेल व राजू शेट्टी यांनी महायुतीत खांद्याला खांदा लावला आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले व त्यांची पलटण बारामतीत आपचे उमेदवार सुरेश खोपडे यांच्यासाठी जिवाचे रान करत असल्याचे चित्र आहे. 

- साखर कारखानदारांचे वर्चस्व काट्यावर 
नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक सहकारी व खासगी साखर कारखानदारांचे भवितव्य या निवडणूकीत टांगणीला लागले आहे. साखर कारखान्यांशी संबंधीत देवदत्त निकम, प्रतिक पाटील, संजय महाडिक, कलाप्पा आवाडे, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, राजीव राजळे, संजय पाटील, संजय मंडलिक रिंगणात आहेत. यातील बहुसंख्य उमेदवारांनी कारखान्यांच्या माध्यमातून केलेल्या कामाच्याच आधारे मतदारांचा कौल मागितला आहे. 

- पत आणि पैसा पणाला 
याशिवाय सद्यस्थितीत साखर कारखानदारीत पडद्यामागचे मुख्य सुत्रधार असलेल्या माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी फलोत्पादनमंत्री विनय कोरे, कल्लपा आवाडे, विक्रमसिंह घाडगे, आमदार सारे पाटील, सी.डी. नरके, सदाशिव मंडलिक, डी.वाय. पाटील, पतंगराव कदम, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हर्षवर्धन पाटील, यशवंतराव  मोहिते, अभयसिंह राजेभोसले, बाळासाहेब देसाई, रामराजे निंबाळकर, अनंतराव थोपटे, अशोक काळे, अंकुश टोपे या घराण्यांचीही पत आणि पैसाही या निवडणूकीत पणाला लागला आहे. 
---------------------- 

No comments:

Post a Comment