Friday, April 18, 2014

लोकसभा निवडणूक उत्साहात - मतदानाचा टक्का वाढला

टीम ऍग्रोवन
पुणे ः लोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातील एकूण 19 लोकसभा मतदारसंघात काल (ता.17) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. यापैकी बहुतेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवारांच्या लढती होत असल्याने चुरशीचे वातावरण होते. अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाची अनिश्‍चिती अधिकच वाढली आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाड, मतदान यादीत नाव नसल्याचे प्रकार घडले. याव्यतिरिक्त सर्व मतदारसंघात सुरळित मतदान पार पडले. दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी 55 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले.

सर्वच मतदारसंघांतील मतदानाला उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा फटका बसला. राज्यभरात अनेक ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदान उत्साहात सुरू होते, पण तापमान वाढले तसे उकाड्यामुळे हळु-हळु मतदानाचा वेगही मंदावला. त्यामुळे दुपारी दोनपर्यंत राज्यात सरासरी 30 ते 35 टक्के इतकेच मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढत गेली. संध्याकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या. रांगेतील सर्वांचे मतदान घेणे बंधनकारक असल्याने वेळ उलटून गेल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदान सुरु होते. यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्‍यता आहे.

- मराठवाडयात उत्साहात मतदान
मराठवाडयातील सहाही मतदारसंघामध्ये मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली. यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 50 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले. उन्हाचा पारा वाढता असल्याने शेतकरी, महिला, युवक व नोकरदार यांनी सकाळच्या वेळेतच मतदान करण्याला पसंती दिली. सकाळी बारा वाजेपर्यंत मतदानला गर्दी झाली होती. दुपारनंतरही बहुतेक मतदानकेंद्रात लांब रांगा लागल्या होत्या. सर्व ठिकाणी सुरळित मतदान पार पडले. मतदारांच्या मोठ्या प्रतिसादामुळे या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज आहे.

- कोल्हापूर, सांगलीत चुरस
कोल्हापूर-सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिवसभर अत्यंत चुरशीच्या वातावरणात उत्साहात मतदान सुरु होते. दुपारी तीनपर्यंत सांगली-कोल्हापूरसाठी 50 तर हातकणंगलेसाठी 55 टक्के मतदान झाले. हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्‍यातील सोनूर्ले गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी लवकर शेतात जाणारे शेतकरी, शेतमजूर यांनी सकाळी मतदान करुनच कामाला जाण्यास पसंती दिल्याने आठ वाजल्यापासून बहुतांशी ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र होते. यानंतर मतदारांना बाहेर काढण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींची धावपळ सुरु झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दुष्काळी भागात मतदानाचा जोर कमी होता. तर पूर्वेकडील भागात चुरशीने मतदान झाले. दुपारी तीन पर्यंत सांगलीत पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान झाले. सांगली व मिरजच्या पुर्वभागात दुपारी पावसामुळे सुमारे एक तास मतदान प्रक्रीया विस्कळित झाली.

- सोलापूर, माढ्यात कडक उन्हातही मतदारांच्या रांगा
सोलापूर व माढा मतदारसंघांमध्ये ऊन्हाचा कडाखा जाणवत असतानाही ग्रामीण भागात अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र होते. सोलापूर मतदारसंघात 45 हजार आणि माढ्यात सुमारे सव्वा लाखापर्यंत नव्याने मतदारांची नोंदणी झाली आहे. त्याचा परिणाम मतदानाचा टक्का वाढण्यावर झाल्याचे सांगितले जाते. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर भागात सकाळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यात महिलांची संख्या अधिक होती. माढा मतदरसंघात करकंब, टेंभुर्णी, अकलूज, करमाळा, माढा येथे मतदानासाठी मोठी चुरस दिसून आली. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात येथेही मतदारांची गर्दी दिसली. दुपारी मात्र उन्हामुळे काहीशा संथगतीने मतदान सुरु होते. एकूणच सर्वत्र चुरस दिसून आली.

- पुण्यात दुपारनंतर गर्दी
पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये दुपारी तीन पर्यंत अवघे 30 ते 35 टक्‍क्‍यांदरम्यान मतदान झाले. दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली. यामुळे अवघ्या दीड दोन तासात सायंकाळी पाच पर्यंत चारही मतदारसंघांमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. पुणे शहरात मतदान यंत्र बिघाडाचे काही प्रकार घडले. मतदारांनी तक्रार केल्यानंतर ही यंत्रे बदलण्यात आली. शिरुर, पुणे व मावळ या तिन मतदारसंघांत अधिक चुरशीचे वातावरण होते. ग्रामिण भागातही पोलिसांच्या कडक पहारा व गस्त सुरु होती. मतदान केंद्र परिसरातील सर्व दुकाने, गर्दीची ठिकाणे र्निमनुष्य करण्यात आली होती.

- मातब्बरांचे भवितव्य पेटीबंद
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे, शिवाजीराव आढळराव पाटील, कल्लापाण्णा आवाडे, धनंजय महाडीक, केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, डॉ पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रियाताई सुळे, राजीव सातव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील आदी मातब्बरांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले.

- अंतिम टप्पा येत्या गुरुवारी
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उर्वरीत 19 मतदारसंघात पुढील आठवड्यात गुरुवारी (दि.24) होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश आहे.
------
मतदारसंघनिहाय मतदान (सायंकाळी 5 पर्यंत)
पुणे - 51.20 टक्के
बारामती - 50.44 टक्के
मावळ - 50.65 टक्के
शिरुर - 53 टक्के
सातारा - 50.32 टक्के
नांदेड - 55.30 टक्के
परभणी - 55.79 टक्के
हिंगोली - 58.27 टक्के
उस्मानाबाद - 55.61 टक्के
लातूर - 57.88 टक्के
बीड - 55.62 टक्के
नगर - 50 टक्के
शिर्डी - 50 टक्के
सोलापूर - 48 टक्के
माढा - 53 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 53.43 टक्के
सांगली - 60 टक्के
कोल्हापूर - 62 टक्के
हातकणंगले - 61 टक्के
---------(समाप्त)------------

No comments:

Post a Comment