Saturday, April 19, 2014

वर्धापनदिन विशेषांक - उमाकांत दांगट

कृषी आयुक्त म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ऍग्रोवन मला नेहमीच अतिशय उपयुक्त ठरला आहे. गेल्या दुष्काळातील आमचा अनुभव या दृष्टीने पुरेसा बोलका आहे. राज्यात गेल्या वर्षी टंचाईची स्थिती होती. तशातच जालना, बीड, औरंगाबाद भागातील मोसंबीच्या बागा सुकायला सुरवात झाली. ऍग्रोवनने याबाबतची वस्तुस्थिती अतिशय प्रभावीपणे मांडली. मी त्या वेळी मराठवाड्याच्याच दौऱ्यावर होतो. बातमी वाचल्यानंतर तातडीने ऍग्रोवनने उल्लेख केलेल्या भागात पोचलो. शेतकऱ्यांना भेटून माहीती घेतली. दुष्काळामुळे बागांची, शेतकर्यांची स्थिती खरोखरच फार बिकट झाली होती. दुष्काळाचा हा फिडबॅक आम्हाला सर्वप्रथम फक्त ऍग्रोवनच्याच माध्यमातून मिळाला. यानंतर तातडीने आम्ही कार्यवाही सुरु केली. दुष्काळात सापडलेल्या बागांचे गांभिर्य केंद्राच्या नजरेस आणून दिले. पाठपुरावा करुन केंद्राच्या अधिकाऱ्यांना पहाणी करण्यासाठी बोलवले. यातूनच पुढे दुष्काळग्रस्त फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठीचे पॅकेज तयार झाले. या प्रश्‍नाची, समस्येची जाणीव ऍग्रोवनने करुन दिली. यातून राज्यातील दुष्काळग्रस्त फळपिकधारकांसाठी सुमारे 660 कोटी रुपयांची मदत वाटण्यात आली. सुरवात मोसंबी पासून झाली, त्याचा फायदा सर्वांनाच झाला.

महाराष्ठ्राच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ऍग्रोवनचे कार्य अतिशय महत्वाचे ठरत आहे. कृषी विस्ताराचे प्रभावी माध्यम म्हणून ऍग्रोवन गेली 10 वर्षे महत्वाची भुमिका बजावत आहे. माझ्या दृष्टीने ऍग्रोवनचे काम दोन बाबतीत कौतुकास्पद आहे. एक म्हणजे शासनाचे धोरण, भुमिका, योजना व त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम. आणि दुसरे म्हणजे शेतकर्ऱ्यांचा प्रतिसाद, प्रतिक्रीया, अपेक्षा शासनापर्यंत पोचविण्याचे काम. ऍग्रोवन या दोन्ही दृष्टीने एकमेकाद्वितीय आहे. कृषी विस्तारासाठी राज्य व केंद्र शासनाची अनेक विस्तार माध्यमे आहेत. मात्र त्यांचा प्रसिद्धी कालखंड वेगळा आहे. संथ आहे. ऍग्रोवन हे दैनिक असल्याने त्यास रियलटाईम व्हॅल्यू आहे.

कृषी आयुक्त म्हणून गेल्या दोन वर्षापासून मी पाहतोय... ऍग्रोवनने आधुनिक तंत्रज्ञान, मार्केट, शेतकऱ्यांचे नाविन्यपुर्ण उपक्रम, यशोगाथा यास महत्वाचे स्थान दिले आहे. शेतकऱ्यांच्या मनाची शेतीपुरक मशागत करण्याचे, कृषी क्षेत्रात ग्रामीण भागातील युवक, नवीन पिढीला शेतीकडे आकर्षिक करण्याचे काम अतिशय महत्वाचे काम यातून घडत आहे. राज्याच्या शेती क्षेत्रासाठी ऍग्रोवनचे हे मोठे योगदान आहे.
-----------
उमाकांत दांगट, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
-----------

No comments:

Post a Comment