Saturday, April 19, 2014

हिंदी महासागराला मॉन्सूनचे वेध !

एप्रिलअखेर स्पष्ट होणार चित्र; हवामान खात्याला अंदाज 23, 25 ला

पुणे (प्रतिनिधी) ः हिंदी महासागराच्या विषुववृत्ताकडील भागाला संपूर्ण भारतीय उपखंडातील जिवसृष्टीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) वेध लागले आहेत. पुढील दहा दिवस मॉन्सूनच्या ढग निर्मितीच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. समुद्रावरील हवेचा अधिक दाब व त्यानंतर किनारी भागाकडून देशांतर्गत भागाकडे कमी होणारा हवेचा दाब यामुळे मॉन्सूनचे वारे वाहण्यास हळूहळू अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

विषुववृत्तीय भागात मॉन्सूनचे ढग निर्माण होण्यासाठी समुद्रपृष्टाचे कमाल तापमान 300 केल्विनहून अधिक असणे उपयुक्त ठरते. सध्या हे तापमान 302 केल्विनच्या आसपास असून पुढील सात दिवसात त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. याबरोबरच भुपृष्टीय भागातील हवेचा प्रवाह व दाबाचा पॅटर्नही हळूहळू निश्‍चित होऊ लागल्याची चिन्हे आहेत. यामुळे मॉन्सूनचा ट्रेड निश्‍चित होण्यास मदत होणार असून पुढील पाच ते दहा दिवसात मॉन्सूनचे चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

मॉन्सूनची वाटचाल, पावसाचे प्रमाण, त्यातील खंड आदी बाबींवर 4 मार्च ते 20 मे या दहा आठवड्यांच्या कालावधीतील हवामानाचा मोठा प्रभाव असतो. विशेषतः एप्रिलमध्ये हवामानातील बदल अधिक तीव्र होऊन मॉन्सून व त्यासाठीची ढगनिर्मिती सुरू होते. हिंदी महासागरात मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. देशात ठिकठिकाणी वाऱ्यांची दिशा, आर्द्रता, तापमान आदी हवामान घटकांमध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. केरळपासून सुमारे तीन ते साडेतीन हजार किलोमीटर अंतरावर हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळील भागापासून नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरु होणार आहे.

- यंदा मॉन्सून धिमा ?
गेल्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हिंदी महासागरात विषुववृत्ताच्या खालच्या बाजूला मॉन्सूनचे ढग तयार होण्यास सुरवात झाली होती. समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 304 केल्विनपर्यंत वाढलेले व हवेचा समुद्रसपाटीच्या पातळीवरील दाब विषुववृत्ताकडून भारतीय उपखंडाकडे कमी कमी झालेला होता. यंदा आत्तापर्यंत ढगांची निर्मिती झाली नसल्याचे उपग्रह छायाचित्रांवरुन दिसते. याबाबत विचारणा केली असता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या लांब पल्ल्याचे हवामान अंदाज विभागाचे संचालक डॉ. डी. एस. पै म्हणाले की एप्रिल अखेरीस वा मेच्या सुरवातिला मॉन्सूनच्या ढगांचे चित्र स्पष्ट होईल. सध्या या भागात कोणतीही "सिस्टीम' तयार झालेली नाही.

- एल निनो दणका देणार ?
यंदा भारतीय उपखंडातील मॉन्सून हवामानावर पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे वाढलेले तापमान व एल निनोचा प्रभाव पडणार असल्याने मॉन्सून सरासरीपेक्षा कमी बरसण्याचा अंदाज हवामानविषयक खासगी संस्थांनी व्यक्त केला आहे. एल निनोचा प्रभाव असेल तर पाऊसमान कमी होते, असा सर्वसाधारण ठोकताळा आहे. हवामान खात्याच्या सुत्रांनीही यंदा एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे नाकारलेले नाही, हे विशेष.

- पुण्यात दक्षिण आशियायी देशांची बैठक सुरु
दरम्यान, दक्षिण आशियायी देशांसाठीचा हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी साऊथ एशिया क्‍लायमेट आऊटलूक फोरमची (एसएसीएएफ) विशेष कार्यशाळा पुण्यात 14 एप्रिलपासून सुरु आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग, नॅशनल क्‍लायमेट सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, जागतीक हवामान संघटना (डब्लू एम ओ) या संस्था, संघटनांसह अफगाणिस्थान, बांग्लादेश, भुतान, मालदिव, मॅनमार, पाकिस्तान, नेपाळ व श्रीलंकेतील हवामानतज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या फोरममार्फत 23 एप्रिलला दक्षिण आशियायी देशांसाठीचा मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात येणार आहे. सध्या हा अंदाज तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

*कोट
""यंदाचा संभाव्य मॉन्सून, एन निनोचा परिणाम याशिवायी अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. याबाबतच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे लवकरच स्पष्ट होतील. दक्षिण आशियायी देशांसाठीचा मॉन्सूनचा अंदाज 23 एप्रिलला तर भारतासाठीचा मॉन्सूनचा लांब पल्ल्याचा अंदाज 25 एप्रिलला जाहिर करण्यात येईल.''
- डॉ. डी. एस. पै, संचालक, लांब पल्ल्याचा अंदाज विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग
------------(समाप्त)-------------


No comments:

Post a Comment