Wednesday, April 9, 2014

मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भात सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाने मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने शुक्रवारी सकाळपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. सांगलीत तीन तर उस्मानाबादमध्ये एक मिलीमिटर पावसाची नोंद झाली. नागपूरमध्येही हलक्‍या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे 41.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

छत्तीसगडपासून विदर्भ, तेलंगना ते कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीच्या पातळीहून 900 मिटर उंचीवर कमी दाबाचा टप्पा सक्रीय आहे. याच वेळी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची सक्रीयता कायम आहे. यामुळे राज्यातील ढगाळ हवामानात वाढ झाली असून ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी वीज पडण्याच्याही घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

*चौकट
- वीज पडून युवकाचा मृत्यू
सातारा (प्रतिनिधी) ः वडूज येथील रानमळा परिसरात बुधवारी (ता.9) वीज पडून राजू साहेबराव काळे (वय 21) या महाविद्यालयीन तरूणाचा व एका म्हैशीचा जागीच मूत्यू झाला. राजू म्हैशी चरावयास घेऊन गेला होता. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट होऊन म्हैशीच्या अंगावर वीज पडली. म्हशीपासून सुमारे दोनशे फुटावर उभ्या असलेल्या राजूचाही मूत्यू झाला.

बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यातील प्रमुख ठिकाणचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 32, अलिबाग 30.1, रत्नागिरी 31.7, पणजी 33.5, डहाणू 32.9, भिरा 39.5, पुणे 37.1, नगर 37.8, जळगाव 38.5, कोल्हापूर 37.1, महाबळेश्‍वर 31.7, मालेगाव 39.5, नाशिक 36.5, सांगली 38, सातारा 38.6, सोलापूर 41.1, उस्मानाबाद 38.4, औरंगाबाद 34.6, परभणी 36.1, अकोला 34.5, अमरावती 39.4, बुलडाणा 32.5, ब्रम्हपुरी 40.9, चंद्रपूर 36.6, नागपूर 39.5, वाशिम 33, वर्धा 38.8, यवतमाळ 37
--------------

No comments:

Post a Comment