Saturday, April 19, 2014

जळगाव, धुळे येथे रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

सकाळ - जळगाव आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

जळगाव, ता. 17 ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) जळगाव व धुळे येथे अनुक्रमे केळी लागवड व व्यवस्थापन आणि कापूस पिकाची लागवड व व्यवस्थापन या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांना आपल्या पिकाविषयीच्या समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रांतून उपलब्ध होणार आहे. ही चर्चासत्रे सर्वांसाठी मोफत खुली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चर्चासत्र चोपडा तालुक्‍यातील वेळोदे येथील श्रीराम मंदीरात सकाळी साडेआठ वाजता सुरु होणार आहे. त्यात "केळी लागवड व व्यवस्थापन' हा या विषयावर केळी तज्ज्ञ के. बी. देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. धुळे जिल्ह्यातील चर्चासत्र शिरधाणे गावातील हनुमान मंदीराच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल. "कापूस पिकाची लागवड व व्यवस्थापन' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात जळगावमधील तेलबिया संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजीव शामराव पाटील मार्गदर्शन करणार आहेत. दीपक फर्टीलायझर्स हे या दोन्ही चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
--------(समाप्त)-------

No comments:

Post a Comment